मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनींमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीच्या काळामध्ये मुंबईकरांवर पाणीकपात करण्याची वेळ येते. परंतु भविष्यात अशाप्रकारची जलवाहिनीला लागलेली गळती आणि दुरुस्ती करावी लागली तर त्याकाळात नागरिकांवर कपात करण्याची वेळ येवू नये याची काळजी आता महापालिकेच्यावतीने घेतली जात आहे. यासाठी सध्या वैतरणातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यासाठी असलेल्या जलवाहिनींसोबत पर्यायी जलवाहिनी आता काढूून टाकलेल्या तानसा जलवाहिनीच्या जागेवर टाकली जाणार आहे. तब्बल ५१ हजार ४३८ किमी लांबीची नवीन पर्यायी जलवाहिनी टाकली जाणार असल्याने भविष्यात मुंबईकरांना मिळणाऱ्या गारगाई पाणी प्रकल्पाचे पाणी तसेच दुरुस्तीच्या काळात पर्यायी जलवाहिनी म्हणून याचा वापर केला जाणार आहे.
तानसा ते गुंदवली या मार्गावर चार जलवाहिनी वापरात असून गारगाई प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर यापूर्ण क्षमतेने वापरण्यात येणार आहेत. या चार पैंकी वैतरणा जलवाहिनी आणि अप्पर वैतरणा जलवाहिनी या अनक्रमे ७० ते ५० वर्षे जुन्या झाल्या आहेत. या जलवाहिनी जुन्या झाल्याने पूर्ण क्षमतेने यातील पाणी वाहून नेले जात नाही. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी वाहून नेल्यास जलवाहिनी फुटणे अथवा जलवाहिनीला हानी पोहोचून आजुबाजुच्या भागात पुराचा धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे गुंदवलीपर्यंत कोणत्याही जलवाहिनीमध्ये बिघाड अथवा दुरुस्तीचे काम हाती घ्यायचे झाल्यास पर्यायी जलवाहिनी असणे आवश्यक आहे, जेणेकरून भांडुप जलशुध्दीकरण केंद्राला अखंडित पाण्याचा पुरवठा होईल.
त्यामुळे या जुन्या जलवाहिनींचा विचार करता तसेच भविष्यातील वाढीव पाण्याची गरज, पाण्याची सुरक्षा आणि पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता तसेच बेसिन स्त्रोत ते गुंदवली टनेल शाफ्टपर्यंत ३०० मि मी व्यासाची नवीन पोलादी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आपत्कालिन परिस्थितीत पर्यायी पुरवठा यातून करता यावा यासाठी नवीन पर्यायी जलवाहिनी वैतरणा खोऱ्यातून ते गुंदवलीपर्यंत टाकण्यात येणार आहे. या कामासाठी अॅपको इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कामांसाठी विविध करांसह सुमारे ३३०० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. तर या कामांसाठी टाटा कन्सल्टींग इंजिनिअर्स लिमिटेड यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. या सल्लागार सेवेकरता सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.
मुंबईला वैतरणा खोऱ्यातील धरणांमधून चार जलवाहिनींद्वारे गुंदवलीपर्यंत पाणी पुरवठा केला जातो. आणि गुंदवलीपासून ते ५५०० मिमी व्यासाच्या गुंदवली कापुरबावडी-भांडुप जल शुध्दीकरण बोगद्याद्वारे भांडप शुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहचवले जाते.






