Monday, October 27, 2025
Happy Diwali

केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या छोट्या बच्चूंसाठी गायिका डॉ अनुराधा पौडवाल यांनी दिला असा मदतीचा हात...

केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या छोट्या बच्चूंसाठी गायिका डॉ अनुराधा पौडवाल यांनी दिला असा मदतीचा हात...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक अर्थात केईएम रुग्णालयासाठी आता विख्यात गायिका डॉ अनुराधा पौडवाल यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त, अनुराधा पौडवाल यांनी आपल्या ‘सर्वोदय फाऊंडेशन’ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून केईएम रुग्णालयास एनआयसीयू व्हेंटिलेटर देणगी स्वरुपात प्रदान केले आहे.

मुंबई महापालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रूग्णालयाला नवजात शिशू अतिदक्षता विभागासाठी (एनआयसीयू) जीवरक्षक प्रणाली (व्हेंटिलेटर) देणगी स्वरूपात दिल्याबाबत पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांचे आम्ही आभारी आहोत, असे उद्गार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी काढले. या व्हेंटिलेटरद्वारे उपचार घेणाऱ्या मुलांपैकी एखादे बाळ भविष्यात एक विख्यात गायक होऊ शकतो, असा सकारात्मक आशावादही त्यांनी व्यक्त केला. गगराणी पुढे म्हणाले की, पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्यावतीने दानस्वरूपात देण्यात आलेला व्हेंटिलेटर अतिशय विनम्रपणे स्वीकारण्याचा मान महानगरपालिका आयुक्त या नात्याने मला मिळाला आहे. डॉ. पौडवाल यांचे भारतीय संगीत आणि भक्तीमय संगितासाठीचे योगदान अतिशय मौल्यवान आहे. भारतातील अनेक पिढ्यांसमोर डॉ. पौडवाल यांचा आदर्श आहे. त्यांचे संगीत क्षेत्रातील समर्पण आणि योगदान हे एका उत्तम शिकवणीसारखेच आहे. समाजासाठी परोपकाराच्या भावनेतून डॉ. पौडवाल यांनी आरोग्य, जल, शिक्षण यासारख्या अनेक क्षेत्रामध्ये त्यांच्या सर्वोदय फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून भरीव योगदान दिले आहे, असेही गगराणी याप्रसंगी म्हणाले.

नवजात शिशू अतिदक्षता विभागासाठी एनआयसीयू व्हेंटिलेटरची गरज होती असे डॉ. अनिता हरिबालकृष्णा यांनी सांगितले. तर, अवघ्या चार दिवसांमध्ये हे व्हेंटिलेटर बंगळूरू येथून मुंबईत केईएम रूग्णालयात दाखल झाले, अशी प्रतिक्रिया डॉ़. अनुराधा पौडवाल यांनी याप्रसंगी व्यक्त केली. याप्रसंगी पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांचे कुटुंबीय, नाना पालकर स्मृती प्रतिष्ठानचे सदस्य कृष्णा महाडिक, केईएम रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, नवजात शिशू अतिदक्षता विभागाच्या विभागप्रमुख डॉ. अनिता हरिबालकृष्णा आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment