मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या खराब फॉर्मबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. फलंदाजीतील सातत्य गमावलेल्या 'सूर्या'ला गंभीर यांनी पूर्ण पाठिंबा दिला असून, त्यांच्या मते वैयक्तिक अपयशामुळे संघाच्या 'अल्ट्रा-अॅग्रेसिव्ह' (अति-आक्रमक) धोरणावर कोणताही परिणाम होणार नाही.
गंभीर म्हणाले, "प्रामाणिकपणे सांगायचे तर, सूर्याचा फॉर्म माझ्यासाठी चिंतेचा विषय नाही. कारण आम्ही ड्रेसिंग रूममध्ये अति-आक्रमक दृष्टिकोन स्वीकारला आहे. जेव्हा तुम्ही हे तत्त्वज्ञान स्वीकारता, तेव्हा अपयश अटळ असते." सूर्यासाठी ३० चेंडूंमध्ये ४० धावा करणे आणि टीका टाळणे सोपे आहे, पण आम्ही सामूहिकरित्या निर्णय घेतला आहे की, या आक्रमक दृष्टिकोनाचा पाठपुरावा करताना अपयशी ठरले तरी चालेल," असे गंभीर यांनी स्पष्ट केले. म्हणजेच, ते वैयक्तिक धावसंख्येपेक्षा खेळाच्या 'ब्रँड'ला अधिक महत्त्व देत आहेत.
गंभीर यांनी सांगितले की, टी-२० क्रिकेटमध्ये केवळ धावा महत्त्वाच्या नसतात, तर 'इम्पॅक्ट' (Impact) महत्त्वाचा असतो. जेव्हा सूर्या पुन्हा फॉर्ममध्ये येईल, तेव्हा तो ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडेल. गंभीर यांनी सूर्यकुमारच्या नेतृत्वगुणांचे कौतुक केले. "सूर्य एक उत्कृष्ट माणूस आहे आणि चांगले लोक चांगले नेते बनतात. त्याचे मुक्त व्यक्तिमत्व टी-२० क्रिकेटच्या साराशी जुळते. टी-२० म्हणजे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती (Freedom and Expression)," असे ते म्हणाले.
गंभीर यांनी खुलासा केला की, त्यांच्या पहिल्याच संभाषणात दोघांनीही हरण्याची भीती कधीही ड्रेसिंग रूममध्ये येऊ द्यायची नाही, यावर सहमती दर्शवली होती. गंभीर म्हणाले, "माझे ध्येय सर्वात यशस्वी प्रशिक्षक बनणे नाही, तर आमचा संघ सर्वात निर्भीड (Fearless) संघ असावा."
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकताच आशिया कप जिंकला, परंतु या स्पर्धेत सूर्याला बॅटने फारशी चांगली कामगिरी करता आली नाही (सात डावांत फक्त ७२ धावा). त्यामुळे त्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. या टीकेच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षक गंभीर यांनी आपल्या कर्णधाराला पूर्ण पाठिंबा देत, संघाच्या 'आक्रमक' धोरणामुळे तात्पुरते अपयश आले तरी चालेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.