भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाचे अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन
मुंबई : भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी कार्यालय हे मंदिरासमान असते. जनसंघाच्या स्थापनेपासूनच कार्यालयातून संघटना उभारणीचे काम, पक्षाच्या सिद्धांतांचे संवर्धन, कार्यकर्ता प्रशिक्षण, जनहितासाठी संघर्ष केला जातो. नवीन प्रदेश कार्यालय पुढच्या अनेक पिढ्या सच्चे कार्यकर्ते घडवेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी व्यक्त केला. शहा यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीच्या नवीन प्रदेश कार्यालयाचे भूमिपूजन सोमवारी संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
शहा म्हणाले की, अन्य सर्व पक्षांसाठी पक्ष कार्यालय ही केवळ वास्तू असते. मात्र भाजप कार्यकर्त्यांसाठी कार्यालय हे मंदिराप्रमाणे असते. भाजप हा एकमेव पक्ष आहे जिथे बूथ अध्यक्ष पार्टीचा अध्यक्ष बनतो. पंतप्रधान, मुख्यमंत्री हे देखील कार्यकर्त्यांमधूनच बनतात. भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही असे म्हणत त्यांनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर टीका केली.
सेवा, त्याग, समर्पण आणि देशभक्तीच्या बळावर जो कार्य करतो तो सामान्य कार्यकर्ताही उंचीवर जाऊ शकतो. नरेंद्र मोदी हे त्याचे उत्कृष्ट उहादरण आहे, असेही शाह यांनी नमूद केले. जो पक्ष लोकशाही मूल्यांवर चालतो तोच पक्ष लोकशाहीचे खऱ्या अर्थाने रक्षण करू शकतो, असा टोला घराणेशाहीवर चालणा-या पक्षांना शहा यांनी लगावला. सर्व शासकीय जिल्ह्यांतील भाजप मुख्यालयांची कामे ही डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होतील. जवळपास ६६० संघटनात्मक जिल्ह्यांपैकी ३७५ जिल्ह्यांत कार्यालये आहेत आणि ९० ठिकाणी काम सुरू आहे असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आज सर्वच आघाड्यांवर अव्वल बनत आहे. गरीब कल्याण, मोफत धान्यवाटप, मोफत वैद्यकीय सुविधांमुळे गरीबांचे जीवन सुकर केले आहे. अर्थव्यवस्था अकराव्या स्थानावरून ४ थ्या क्रमांकाची बनली आहे. देश बलशाली, आत्मनिर्भर आणि सुरक्षित बनला आहे. दहशतवादी हल्ले करणा-यांना जबर धडा शिकवला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांनी प्रत्येक शासकीय जिल्ह्यांत भाजपाचे कार्यालय असावे हा निर्धार केला होता त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रदेश कार्यालयाचे भूमिपूजन होणे हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. दोन ते अडीच वर्षांत हे कार्यालय बांधून पूर्ण होईल. जनसामान्यांना न्याय तसेच कार्यालयात कार्यकर्त्यांना प्रशिक्षण मिळायला हवे, या हेतूने देशभरात भाजपच्या कार्यालय निर्माणाचे काम वेगाने सुरू आहे.