कथा : रमेश तांबे
दिवाळी नुकतीच संपली होती. दिवाळीचे चार-पाच दिवस कसे संपले हे नमिताला कळलेच नव्हते. दिवाळी येणार म्हणून नमिताने किती तयारी केली होती. नवे कपडे काय, नव्या चपला काय. बाबांच्या मागे लागून चक्क सोन्याची एक साखळीदेखील तिने घेतली होती. त्यामुळे नमिता एकदम खुष होती. मोठ्या अभिमानाने सोन्याची साखळी गळ्यात घालून मिरवत होती. आपल्या मैत्रिणींना दाखवत होती. नमिताचे बाबा एका कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करायचे. आईदेखील एका प्रथितयश कंपनीत कामाला होती. त्यामुळे घरात पैसा खेळता होता. आई-बाबांची नमिता ही एकुलती एक मुलगी. त्यामुळे ते तिला काही कमी पडू देत नव्हते. नमिताचे सारे हट्ट पुरविण्यात बाबांना खूप आनंद वाटत असे.
पण यामुळे नमिता खूप लाडावलेली आणि हट्टी मुलगी बनली होती. हवा तसा हवा तेव्हा पैसा खर्च करीत होती. लहान वयात तिच्या हातात पैसा खेळू लागला होता. त्यामुळे तिच्या स्वभावात एक हट्टीपणा, अहंमपणा आला होता. स्वतःच्या मैत्रिणीदेखील गाडी, मोठं घर, खिशात पैसा असणाऱ्याच तिने निवडल्या होत्या. नमिताच्या आईच्या ही गोष्ट लक्षात आली होती. पण बाबांचा नमिता म्हणजे जीव की प्राण. त्यामुळे नमिताच्या वागण्या बोलण्याकडे ते नेहमीच दुर्लक्ष करत होते. पण आईला मात्र काळजी वाटत होती. दोन दिवसांपूर्वीच भाऊबीज संपली होती. आईला सख्खा भाऊ नव्हता. पण तिचा चुलत भाऊ या वर्षी पहिल्यांदाच भाऊबीजेसाठी गावाहून मुंबईला येणार होता. त्यामुळे सकाळपासून आईची लगबग सुरू होती. पुरणपोळ्यांचा छान बेत तिने आखला होता. त्याच्यासाठी नवे कपडेसुद्धा आणले होते. सकाळी बरोबर १० वाजता नमिताचा मामा त्याच्या लहान मुलासह घरी आला. घराची बेल वाजली. नमिताने दरवाजा उघडला. तर एक अगदी साधा माणूस आपल्या छोट्या मुलासह दरवाजात उभा होता. पहिल्यांदाच मामा घरी आला होता त्यामुळे नमिताने त्याला ओळखण्याचा प्रश्न नव्हता. पण त्यांचा एकंदरीत गबाळा वेष पाहून नमिताने नाक मुरडले. तोच आई धावत आली. “अरे अनिल दादा ये. यशदेखील आलाय का तुझ्यासोबत!” आईने मोठ्या प्रेमाने हसून स्वागत केले. मग हातपाय धुवून ते समोरच्या कोचवर बसले. मोठ्या कौतुकाने बघत मामा म्हणाला, “अगं ताई हीच का तुझी नमू? केवढी मोठी झाली आहे बघ!” पण नमिताच्या कपाळावर आठ्या कायम होत्या. मग बाबांसोबत मामाच्या गप्पा झाल्या. एवढा वेळ तो लहानगा यश तसाच बसून होता. नमिताने तर त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. मग भाऊबीजेचा कार्यक्रम यथासांग पार पडला. आईने भावासाठी नवे कपडे आणले होते ते त्याच्या हातात दिले. मग आई मामाच्या पाया पडली. नमिता हे सारे एका वेगळ्याच नजरेने बघत होती. आईने नमिताला त्या छोट्या यशला ओवाळायला सांगितले. पण नमिताने स्पष्ट नकारच दिला.
जेवण वगैरे आटोपून आईने भावाला अन् भाच्याला निरोप दिला. पण आईचा चेहरा मात्र रागाने नुसता लालेलाल झाला होता. नमिताने यशला ओवाळण्यास नकार दिला त्याचे तिला खूप वाईट वाटले. रागही आला होता. तिने नमिताला विचारले, “काय गं नमे का नाही ओवाळलेस यशला?” तशी नमिता म्हणाली, “हे बघ आई अशा गबाळ्या मुलाला मी कशी काय ओवाळणार. काय त्याचे दिसणे, कसे त्याचे कपडे, अन् बोलणे तर एकदमच गावाकडचे! मला तर तो एकदम गावठीच वाटला बघ!” आता मात्र आईच्या रागाचा पारा चढला. तिने नमिताच्या थोबाडीतच ठेवून दिली. ती रागाने थरथरत होती. आई नमिताला म्हणाली, “आज तू जिवंत आहेस ना ते याच गावठी मामामुळे लक्षात ठेव! लहानपणी तू किडनीच्या आजाराने आजारी होतीस. किडनी बदलण्याशिवाय पर्याय नव्हता. माझी आणि बाबांची किडनी तुला बसत नव्हती. शेवटी याच तुझ्या गावठी मामाने नको नको म्हणत असताना त्याची एक किडनी तुला दिली म्हणून तू आज जिवंत आहेस. एवढी कृतघ्न असशील असं वाटलं नव्हतं मला.” आपल्या भावाचा झालेला अपमान आईला सहन झाला नाही.
आईचे बोलणे ऐकून नमिताच्या पायाखालची वाळूच सरकली. माझे जीवन केवळ या मामामुळे आहे हे समजताच नमिता तीरासारखी धावत घराबाहेर पडली. मामा आणि तिचा मामेभाऊ यश अजूनही एसटी स्टॅण्डवरच उभे होते. तिथे जाऊन तिने मामाची माफी मागितली. त्यांना ती पुन्हा घरी घेऊन आली आणि मोठ्या प्रेमाने, कृतज्ञतेने मामेभावाला ओवाळले. त्याला गोड मिठाई भरवली अन् बाबांनी तिच्यासाठी घेतलेली सोन्याची साखळी तिने यशच्या गळ्यात घातली. आता नमिताचे मन एखाद्या खळाळत्या झऱ्यासारखे स्वच्छ आणि निर्मळ बनले होते. नमिताच्या या कृतीमुळे घरातले वातावरण एकदम बदलून गेले. आई-बाबांच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागले. नमिताने भावाला मिठी मारली अन् रडत रडत मामाला म्हणाली, “मामा, माफ कर.” मला तुमच्या मनाची श्रीमंती नाही ओळखता आली.