Saturday, October 25, 2025
Happy Diwali

पारदर्शक पदार्थ

पारदर्शक पदार्थ

कथा : प्रा. देवबा पाटील

सीता व निता या दोघी बहिणींना जशी अभ्यासाची गोडी होती तशीच वाचनाचीसुद्धा आवड होती. त्या सतत टीव्हीसमोर बसत नसत का मोबाइललासुद्धा चिपकून राहत नसत. त्या रोज फक्त अर्धाच तास टी. व्ही. बघायच्या. तेही अभ्यास संपल्यानंतर रिकाम्या वेळी. मोबाइलचा तर पप्पांच्या समोर अभ्यासापुरता वापर करायच्या. पण दररोज न चुकता दोघीही अर्धा तास छान छान गोष्टींची, गोड गोड कवितांची पुस्तके मात्र जरूर वाचायच्या. जीवन जगण्यास जसा प्राणवायू हा शरीरास अत्यावश्यक असतो तसे जीवन सुगम, सुकर, समृद्ध नि संपन्न बनविण्यास उत्तमोत्तम साहित्य वाचनाची मनास अत्यंत गरज असते, हे त्यांचे आई-बाबा जाणून होते. म्हणून ते दरमहा त्यांची वाचनाची हौस आनंदाने पुरवित होते. ऊन उतरता उतरता त्या दोघींनीही “मावशी चलायचे का आपण आता गच्चीवर? आम्हाला तुमच्याकडून आज बरीच माहिती जाणून घ्यायची आहे.” ही वाक्ये त्यांनी मावशीला आळीपाळीने म्हटली.

मावशी म्हणाली, “चला. एक सतरंजी घ्या आपल्याला बसायला. म्हणजे गच्ची जर थोडीफार गरम असली तर आपणास गच्चीचे चटके नाही लागणार व आपले बसणे थोडेसे सुखद होईल.” मावशी म्हणाली.

‘हो, मावशी,’ असे म्हणत त्यांनी मावशीने सांगितल्यानुसार घरातून एक जाडशी सतरंजी आणली. सीताने ती सतरंजीची घडी आपल्यासोबत घेतली. अशा त्या दोघी सतरंजी घेऊन घराचा जिना चढून गच्चीवर जाऊ लागल्या तशी मावशीही त्यांच्या पाठोपाठ गच्चीवर आली. मुलींनी गच्चीवर सतरंजी अंथरली. मावशी सतरंजीवर खाली बसली व तिच्याजवळ तिच्या दोन्ही बाजूंना या दोन मुली बसल्या.

“मावशी हवेचे रेणू कसे काय असतात? ते तर आपणास दिसतसुद्धा नाहीत.” निताने आपली शंका प्रदर्शित केली. मावशी म्हणाली, “अगं, जर आपणास हवाच दिसत नाही तर हवेचे रेणू कसे काय दिसतील? तुम्हाला पारदर्शक आणि अपारदर्शक पदार्थांची व्याख्या माहीत आहे का?” मावशीने सहज प्रश्न केला. ‘हो, मावशी’, सीता आनंदात म्हणाली, ‘सांगू मी?’ ‘सांग बरं’, मावशीने तिला प्रोत्साहन देत म्हटले. “ज्या पदार्थातून सूर्यप्रकाश आरपार जातो त्याला पारदर्शक पदार्थ म्हणतात. उदा. काच, स्वच्छ पाणी.” सीता उत्तरली. “मी अपारदर्शक पदार्थाची व्याख्या सांगू मावशी.” निताने उत्साहाने विचारले. “सांग बरं बाळा.” मावशी तिचेही कौतुक करीत बोलली. “ज्या पदार्थातून सूर्यप्रकाश मुळीच जात नाही त्याला अपारदर्शक पदार्थ म्हणतात. उदा. लाकूड, दगड, माती, लोखंड इ.” निताने सांगितले. “छान बाळांनो! तुमच्या व्याख्याही पाठ आहेत हे बघून मलाही आनंद झाला. पण अपारदर्शक पदार्थातून प्रकाश आरपार जात नाही. मग तो कोठे जातो? का तेथेच अडतो?,” मावशीने प्रश्न केले. “माहीत नाही मावशी.” त्या म्हणाल्या. “तर तो प्रकाश अंशत: त्या अपारदर्शक पदार्थात शोषला जातो व उरलेला पदार्थाच्या पृष्ठभागावरून परावर्तित होतो. परावर्तन म्हणजे माहीत आहे ना तुम्हाला? का सांगू,” तेही मावशीने विचारले. “ते माहीत आहे मावशी.” सीता म्हणाली. “आम्हाला वर्गात शिकवले आहे”. निताने सांगितले. “अर्धपारदर्शक पदार्थ माहीत आहेत का तुम्हाला?” मावशीने त्यांना प्रश्न केला. “नाही मावशी. दोघीही एकसाथ उत्तरल्या. “तर ज्या पदार्थांमधून प्रकाशकिरण अंशत: आरपार जातात आणि अंशत: त्या पदार्थावरून परावर्तित होतात अशा पदार्थांना अर्धपारदर्शक किंवा मितपारदर्शक पदार्थ असे म्हणतात. उदा. दूध, दुधी काच, कागद, कापड इ. बरे, सूर्यप्रकाश पदार्थामधून आरपार का जातो व का जात नाही हे माहीत आहे का तुम्हाला?” मावशीने पुन्हा विचारले. “नाही मावशी.” दोघीही म्हणाल्या. प्रकाश किरण जेव्हा एखाद्या भागावर पडतात तेव्हा तो पदार्थ जर काच किंवा पाण्यासारखा पारदर्शक असला तर किरण त्यातून आरपार जातात, आरशासारखा चमकदार असल्यास किरणांचे त्यावरून परावर्तन होते; परंतु प्रकाश किरण जेव्हा खडबडीत भागावर पडतात तेव्हा ते त्या भागावरून चोहिकडे विखुरतात. मावशीने उत्तर दिले. एवढ्यात त्यांना त्यांच्या आईने आवाज दिला व त्या तिघीही खाली गेल्या.

Comments
Add Comment