Sunday, October 26, 2025
Happy Diwali

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोटींचे ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यावर टाकली धाड, मुंबई पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोटींचे ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यावर टाकली धाड, मुंबई पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी!

मुंबई: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्स कारखान्यावर छाप टाकत लाखोंचा माल जप्त करण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पेल्हार पोलीसांच्या हद्दीत एमडी नावाचे अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना सुरु असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीत या कारखान्यातून एमडी आणि इतर साहित्य असे मिळून एकूण १३.४४ कोटींचा माल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली.

मुंबईच्या टिळकनगर पोलीस ठाण्यातील झोन क्र.६ चे पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी ही कारवाई केली आहे. प्राथमिक कारवाईत एम. डी. विक्रीसाठी आलेल्या आरोपीला पकडून त्याच्याकडून ५७.८४ ग्रॅम अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. पुढील तपासात त्याच्याशी संबंधित आणखी चार आरोपींना मुंबई व मिरा रोड येथून अटक करण्यात आली. या आरोपींच्या चौकशीतून पालघर जिल्ह्यातील नालासोपारा (पूर्व) येथील रशीद कंपाऊंडमध्ये अंमली पदार्थ निर्मितीचा मोठा कारखाना चालवला जात असल्याची माहिती मिळाली.

या माहितीनुसार मुंबई पोलीसांनी छापा टाकून उत्पादन करणाऱ्या टोळीतील एका प्रमुख आरोपीला अटक केली आणि कारखान्यातून ६.६७५ किलो एम.डी, तसेच निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल व यंत्रसामग्री असा एकूण ₹१३.४४ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे

मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत पेल्हार-रशीद कंपाऊंडमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे,चाळी,कारखाने आहेत. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा आव आणणाऱ्या पालिकेने या बांधकामांकडे दुर्लक्ष केले आहे. पालिकेचा हा निष्काळजीपणा आता चांगलाच भोवला असून दुर्लक्षित झालेल्या या भागात दारुचे आणि अंमली पदार्थांचे अड्डे अशी गुन्हेगारी प्रवृती वाढणाऱ्या घटना घडत असल्याचे या प्रकरणामुळे उघड झाले आहे.

या माहितीच्या आधारे उपायुक्त शेख यांच्या नेतृत्वाखाली रशीद कंपाऊंडमध्ये धाड टाकण्यात आली.रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत या कारखान्यात एमडी तयार केले जाते आणि त्यानंतर ते सर्वत्र पाठवले जात असल्याची माहिती या धाडीत पोलीसांना मिळाली आहे.या कारवाईत ५ जणांना अटक करण्यात आली असून, त्यातील ४ जण मुंबई आणि एक नालासोपारातील असल्याचे समजते. या प्रकरणी सदर कारखाना उभा करणारे बांधकाम ठेकेदार, जागा मालक, महापालिका अधिकारी आणि स्थानिक पोलीस तितकेच जबाबदार असून, त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >