सातारा : फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयातील एका तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी असलेल्या निलंबित पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांनाही अटक केली असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
गुरुवारी रात्री डॉक्टर तरुणीने एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. घटनेनंतर पोलिसांना तिच्या हातावर लिहिलेला संदेश आढळून आला. त्यात तिने आपल्या मृत्यूसाठी पीएसआय गोपाल बदने यांना जबाबदार ठरवत “त्यांनी माझ्यावर चार वेळा अत्याचार केला, तसेच प्रशांत बनकरने गेल्या काही महिन्यांपासून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला,” असे नमूद केले होते.
घटनेनंतर काही दिवसांच्या शोधमोहिमेनंतर निलंबित पीएसआय गोपाल बदने शनिवारी रात्री उशिरा फलटण पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. त्यानंतर रविवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने बदनेला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बदनेच्या वतीने वकील राहुल धायगुडे यांनी कोर्टात युक्तिवाद करताना सांगितले की, मृत डॉक्टरने आपल्या सुसाईड नोटमध्ये कोणत्या ठिकाणी आणि कधी अत्याचार झाले हे स्पष्ट नमूद केलेले नाही. त्यामुळे हे आरोप अस्पष्ट असून, त्याला कोणतेही ठोस पुरावे नाहीत, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सरकारी वकीलांनी मात्र या युक्तिवादाला विरोध करत सर्वोच्च न्यायालयातील उदाहरण देत सांगितले की, “मरणाऱ्याचे शब्द हे सत्य मानले जातात.” त्यामुळे सखोल तपासासाठी पोलिसांना वेळ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी कोर्टासमोर मांडले.
या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रशांत बनकरला न्यायालयाने आधीच २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉक्टरने आपल्या सुसाईड नोटमध्ये बनकरवर मानसिक आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. पोलिस सध्या या दोन्ही आरोपींच्या चौकशीसह संपूर्ण प्रकरणातील पुरावे तपासत आहेत.