मुंबई : चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा यांचं २५ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. ते किडनीच्या आजारामुळे त्रस्त होते. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. 'मै हू ना', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' , 'मुझसे शादी करोगे', 'जाने भी दो यारो' यांसारख्या चित्रपटांमधून भूमिकांतून सतीश शहांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. सतीश शहांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. दिवंगत सतीश शहा यांना सोशल मीडियासह सर्वच माध्यमांतून श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकार मंडळींनी भावुक पोस्ट शेअर केल्या आहेत. तसेच अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
अशातच अभिनेता सुमित राघवनने एक भावुक व्हिडीओ शेअर करत सतीश शहांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. सिनेमातील अनेक भूमिकांसोबतच सतीश शहांची एक भूमिका प्रचंड गाजली आणि ती म्हणजे 'साराभाई वर्सेस साराभाई' मधली इंद्रवदन ही भूमिका. या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यात सतीश शहांच्या मोठ्या मुलाची भूमिका अभिनेता सुमित राघवनने केली होती. त्यामुळे सतीश शाह यांच्या निधनाबद्दल कळताच अभिनेत्याला अश्रू अनावर झाले. सोशल मीडियाद्वारे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सुमित राघवन म्हणाले " २००४ मध्ये आपण एक शो सुरू केला होता; पण फक्त ७० एपिसोड नंतर तो बंद करावा लागला. आज २१ वर्षांनी हाच शो लोकांच्या हृदयात घर करून गेला. तो शो म्हणजे साराभाई वर्सेस साराभाई. प्रेक्षकांनी या शोला खूप प्रेम दिलं. त्यामुळे कलाकारांनाही एक वेगळी ओळख मिळाली. लोक भेटले की अनेकदा बोलतात 'मी माझ्या घरचा साहिल आहे', 'तो आमच्या घरचा रोशेश आहे' , किंवा 'माझी पत्नी अगदी मोनिशासारखी वागते'. पण कधीही कोणी सांगितले नाही की हा आमच्या घरचा इंद्रवदन आहे. कारण इंद्रवदन फक्त एकच होता ते म्हणजे सतीशकाका. ते सतीशकाका आपल्याला सोडून गेले. त्यानंतर सुमित यांनी शोमधील कलाकारांच्या खास नात्याबद्दल सांगितले, ते पुढे म्हणाले "शो जितका मोठा झाला, तितकचं आपलं नातं घट्ट झालं, त्यामुळे आपण भेटायचो, तेव्हा आपण एकमेकांना सुमित , रुपाली किंवा राजेश म्हणत नव्हतो; आपण साहिल , मनीषा , रोशेश ,पापा आणि मम्मी म्हणूनच हाक मारायचो. "पुढे सुमित अधिक भावुक होत म्हणाला "आज साराभाई कुटुंबाचा मुख्य माणूस, आपला सर्वात ज्येष्ठ सदस्य आपल्याला सोडून गेला. काही काळ तो संघर्ष करत होता, आणि शेवटी तो आपल्याला सोडून गेला."