एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला
नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित एका शासकीय कार्यक्रमात (रोजगार मेळाव्यात) पोस्ट खात्यातील दोन उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्ची आणि प्रोटोकॉलवरून तुंबळ भांडण झाले. नागपूरच्या पोस्टमास्टर जनरल पदाचा वाद थेट 'लाईव्ह' कार्यक्रमात चव्हाट्यावर आल्याने टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
राजनगर येथील नॅशनल फायर सर्व्हिसेस कॉलेजच्या सभागृहात रोजगार मेळावा सुरू होता. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व्यासपीठावर उपस्थित होते. नागपूर पोस्टमास्टर जनरल म्हणून प्रभारी पद सांभाळणाऱ्या सुचिता जोशी व्यासपीठावर सोफ्यावर बसल्या होत्या. यावेळी, बदली झालेल्या आणि न्यायालयात दाद मागणा-या पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे यांनीही मंचावर प्रवेश केला.
दोघी एकाच सोफ्यावर बसल्यानंतर त्यांच्यात 'खुर्ची' आणि 'पदा'वरून शाब्दिक चकमक सुरू झाली, जी लवकरच हाणामारीपर्यंत पोहोचली.
शोभा मधाळे यांनी सुचिता जोशी यांच्या हाताला धक्का देऊन त्यांच्या साडीवर पाणी ओतले आणि डाव्या हाताला चिमटाही काढला.
हा सारा प्रकार समोर बसलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर घडत होता. मात्र, उच्चपदस्थ अधिकारी असल्याने कुणीही हस्तक्षेप केला नाही.
नागपूरच्या पोस्टमास्टर जनरल पदावरून गेल्या काही महिन्यांपासून दोन अधिकाऱ्यांमध्ये दावेदारी सुरू आहे. शोभा मधाळे यांची ८ सप्टेंबर रोजी कर्नाटकातील धारवाड येथे बदली झाली. मात्र, त्यांनी बदलीच्या आदेशाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे आणि आदेशाला स्थगिती मिळाल्यामुळे त्या कार्यालयात रुजू होत आहेत.
दुसरीकडे, विभागाने नियमित नियुक्ती होईपर्यंत नवी मुंबईच्या पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी यांच्याकडे नागपूरचा प्रभारी पदभार सोपवला आहे.
विभागाकडून या पदावर तातडीने निर्णय होत नसल्याने 'पोस्टमास्टर जनरल' पद नेमके कुणाकडे, यावरून तिढा निर्माण झाला आहे आणि याच गोंधळातून वाद विकोपाला गेला.
घडलेल्या प्रकाराबद्दल अधिकारी सुचिता जोशी या विभागाकडे अधिकृत तक्रार करणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या घटनेनंतर तरी टपाल विभाग नागपूरच्या पोस्टमास्टर जनरल पदाबाबत तातडीने निर्णय घेतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.