सातारा : फलटण येथे घडलेल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की, पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने तिच्यावर अत्याचार केला आणि प्रशांत बनकर याने चार महिने मानसिक व शारीरिक छळ केला.
या गंभीर प्रकरणात पोलिसांनी प्रशांत बनकर याला पुण्यातून अटक केली असून, त्याला फलटणच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयात हजर केले गेले. सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली, तर आरोपीच्या वकिलांनी कमीत कमी कालावधीची कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा विचार करून चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या आदेशानुसार, बनकर २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे. सह दिवाणी न्यायाधीश ए. एस. साटोटे यांनी हा निर्णय दिला.
घटनेनंतर पोलिसांनी दोन संशयितांचा शोध सुरू केला होता. दुसरा संशयित आरोपी गोपाल बदने अद्याप फरार आहे. त्याचे शेवटचे लोकेशन पंढरपूर होते. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे, पण अद्याप तो सापडलेला नाही.
प्रशांत बनकरच्या घरातील वरच्या खोलीत मृत डॉक्टर तरुणीचे वास्तव्य होते. त्या रूमला पोलीसांनी सील केले आहे. बनकरच्या आई-वडिलांनी आणि भावाने सांगितले की, मुलाने डॉक्टर तरुणीला कधीही त्रास दिला नाही. त्यांनी तपास सखोल करण्याची मागणी करत म्हटले की, सत्य समोर येईल आणि आरोप खोटे असल्याचे उघड होईल. त्यांच्या मते, डॉक्टर तरुणी एक वर्षापासून त्यांच्या घरात राहत होती आणि मुलाने त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींच्या घरांची झडती देखील घेतली आहे
मृत डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांनी प्रशांत बनकरला मुख्य आरोपी मानत त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.






