मुंबई: भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसह आगामी टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात अनेक बदल जाहीर केले आहेत. न्यू साउथ वेल्सचा २५ वर्षांचा ऑलराउंडर जॅक एडवर्ड्स याची पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन वरिष्ठ संघात निवड करण्यात आली आहे. त्याला सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, ग्लेन मॅक्सवेल आणि बेन ड्वार्शुइस यांच्या फिटनेस रिपोर्ट्स सुधारल्यानंतर ते भारताविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेच्या अखेरच्या टप्प्यात संघात परतणार आहेत. याशिवाय, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा युवा वेगवान गोलंदाज माहली बिअर्डमन यालाही टी-२० संघात स्थान मिळाले आहे.
२० वर्षांचा माहली बिअर्डमन शेवटच्या तीन टी-२० सामन्यांसाठी संघात निवडला गेला आहे. त्याने अलीकडेच अंडर-१९ मध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि पर्थ स्कॉर्चर्ससाठी चमकदार कामगिरी केली. बिग बॅश लीगमधील आपल्या दुसऱ्या सामन्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या, तसेच लिस्ट-ए क्रिकेटमध्ये फक्त चार सामन्यांत १२ बळी माहलीने घेतले आहेत. जॅक एडवर्ड्सचा संघात समावेश भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया ए संघासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीनंतर झाला आहे. लखनऊतील चार दिवसीय सामन्यात त्याने ८८ धावा केल्या, तर कानपूरमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेत ४/५६ अशी गोलंदाजी करत ८९ धावांची खेळी केली होती.
ऑस्ट्रेलियाच्या संघात फेरबदल
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २४ ऑक्टोबर रोजी या बदलांची घोषणा केली. मार्नस लाबुशेन याला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी संघातून मुक्त करण्यात आले असून, तो आता २८ ऑक्टोबरपासून गाबा येथे सुरू होणाऱ्या शेफील्ड शिल्ड सामन्यासाठी क्वीन्सलँड संघात सामील होईल. जोश हेजलवुड आणि सीन अॅबॉट हे दोघेही भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेच्या शेवटी उपलब्ध राहणार नाहीत. हेजलवुड फक्त पहिल्या दोन टी-२० सामन्यांत खेळेल, तर अॅबॉट तिसऱ्या सामन्यानंतर (होबार्टमध्ये) संघातून बाहेर पडेल. स्पिनर मॅथ्यू कुहनेमन, ज्याने पर्थमधील पहिला वनडे सामना खेळला होता, त्याला पुन्हा सिडनीतील एकदिवसीय सामन्यासाठी संघात बोलावण्यात आले आहे. जॉश फिलिप यालाही टी-२० संघात स्थान मिळाले आहे, कारण जॉश इंग्लिस अजून दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. ग्लेन मॅक्सवेल याला न्यूझीलंड दौऱ्यात नेट्समध्ये सरावादरम्यान मनगटाला झालेल्या फ्रॅक्चरमुळे सुरुवातीच्या दोन टी-२० सामन्यांतून विश्रांती देण्यात आली होती, पण आता तो शेवटच्या तीन सामन्यांसाठी परतणार आहे.
भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ : मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कूपर कॉनोली, जॅक एडवर्ड्स, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिस (यष्टीरक्षक), मॅथ्यू कुनमन, मिचेल ओवेन, जोश फिलिप (यष्टीरक्षक), मॅट रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, अॅडम झांपा.