मुंबई : यंदा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अती पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी उभी पिकं वाहून गेली. केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या मदतीने नागरिक त्या संकटातून सावरत असतानाच हवामान खात्याने महाराष्ट्राला आज आणि उद्यासाठी पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज म्हणजेच शुक्रवार २४ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच हवामान विभागाने उद्या म्हणजेच शनिवार २५ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील सांगली, सोलापूर, धुळे, नंदूरबार, अमरावती, अकोला, बुलढाणा, पालघर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, धाराशीव, जालना बीड, नंदुरबार या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. राज्यात काही ठिकाणी आजपासून दोन - चार दिवस पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.