मुंबई: मालाड पश्चिम येथील माइंडस्पेसजवळ लिंक रोडवरील फोर डायमेंशन बिल्डिंगमध्ये शुक्रवारी आग लागली. मुंबई अग्निशमन दलाला (एमएफबी) घटनेची माहिती मिळाली. ही लेव्हल-२ दर्जाची आग पाचव्या मजल्यावरील कॉल सेंटर युनिटमध्ये मर्यादित होती. सुमारे १५,००० चौरस फूट क्षेत्रात पसरलेल्या या आगीत इलेक्ट्रिक वायरिंग, संगणक, सर्व्हर रूम, फॉल्स सीलिंग, फर्निचर आणि काचेच्या भागांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आग विझवण्यासाठी सात अग्निशमन इंजिन, चार जंबो टँकर, दोन पाण्याचे टँकर, एक हवाई शिडी प्लॅटफॉर्म आणि १०८ रुग्णवाहिका हे पथक घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सकाळी ९ वाजेपर्यंत आग पूर्णपणे विझवण्यात आली. सध्या अग्निशमन दलाने सुरक्षिततेसाठी इमारतीचे निरीक्षण सुरू केले आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. पण अग्निशमन दलाच्या सतर्क आणि वेगवान हालचालींमुळे गंभीर दुर्घटना टळल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत पुणे शहरात ६५ तर पिंपरी-चिंचवडमध्ये १७ आगींच्या घटना नोंदल्या गेल्या. फटाके, सजावटीचे दिवे आणि विजेच्या तारा यांमुळे या आगी लागल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या रात्री सर्वाधिक ३६ आगी लागल्या, तर पाडवा आणि भाऊबीजेच्या दिवशी अनुक्रमे १४ आणि ९ घटना घडल्या.