डॉ. संपदा मुंडेंच्या पत्रात खासदाराचाही उल्लेख, फलटण प्रकरणात मोठी अपडेट समोर
सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे एक धक्कादायक वळण आले आहे. डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या हातावर लिहिलेल्या चिठ्ठीत (सुसाईड नोट) एका पोलीस उपनिरीक्षकाचे आणि एका घरमालकाच्या मुलाचे नाव लिहिले होते. पण आता एक नवीन माहिती समोर आली आहे, ती म्हणजे, डॉक्टरने यापूर्वी केलेल्या एका तक्रारीत एका खासदाराचाही उल्लेख होता!
आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव डॉ. संपदा मुंडे आहे. त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. त्यांच्या हातावरील चिठ्ठीत स्पष्ट लिहिले आहे की, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ मदने याने त्यांच्यावर चारवेळा बलात्कार (Rape) केला. तसेच, प्रशांत बनकर नावाच्या तरुणाने त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. प्रशांत बनकर हा डॉ. संपदा जिथे भाड्याने राहत होत्या, त्या घरमालकाचा मुलगा आहे. गोपाळ मदने हा फलटण ग्रामीण पोलीस दलात कामाला होता, पण आता त्याला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आता या दोघांचाही शोध घेत आहेत.
खासदारांचे कनेक्शन
डॉ. संपदा यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे की, संपदा यांनी यापूर्वी एका खासदारावर पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला होता. खासदारांच्या पीएने (खासगी सहायक) फोन करून संपदा यांना फिटनेस सर्टिफिकेट देण्यास सांगितले. त्यांनी आरोप केला की, संशयित आरोपी रुग्णालयात न येताही त्यांना 'फिट' असल्याचे सर्टिफिकेट देण्यासाठी संपदा यांच्यावर दबाव टाकला जात होता.
छळ आणि अत्याचाराचे कारण
डॉ. संपदा मुंडे यांच्यावर पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्रातील काही लोक दबाव टाकत होते. पोलीस संशयित आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी आणायचे आणि डॉ. संपदा यांच्याकडे ते 'फिट' असल्याचे प्रमाणपत्र (Fitness Certificate) देण्याची मागणी करायचे. पण डॉ. संपदा यांनी यासाठी नकार दिला आणि त्या फक्त खरी माहिती देणार असल्याचे सांगितले. यामुळे त्यांचा छळ सुरू झाला.
एका पत्रात त्यांनी लिहिले आहे की, प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्यावर पोलिसांनी त्यांना त्रास (Torture) द्यायला सुरुवात केली. विशेष म्हणजे, एकावेळी त्यांना खासदारांनी सुद्धा फोन करून विचारले की, "तुम्ही बीडचे मुंडे असल्याने पोलिसांना प्रमाणपत्र देत नाही का?" असा पोलिसांचा आरोप आहे.
पोलिसांनी त्यांच्यावर 'बीडचे मुंडे कसे असतात, कसे गुन्हे करतात,' असे म्हणून सतत हिणवले जात होते, असेही समोर आले आहे. पोलीस निरीक्षक अनिल महाडीक यांचाही तक्रारीत उल्लेख आहे.
डॉ. संपदा यांनी जूनमध्ये याबाबत तक्रार केली होती, पण कोणीही दखल घेतली नाही. जूनमध्ये केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने १३ ऑगस्ट रोजी त्यांनी पुन्हा माहिती अधिकार टाकून डीवायएसपी कार्यालयाकडून माहिती मागवली. मात्र, तपासात कोणतेही सहकार्य होत नसल्याने आणि शारिरीक आणि मानसिक अत्याचार होत असल्याने शारीरिक आणि मानसिक छळ असह्य झाल्यामुळे त्यांनी अखेर हे टोकाचे पाऊल उचलून आयुष्य संपवले.
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी सांगितले की, पोलीस आता या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत.