मुंबई: जोगेश्वरी पश्चिम भागातील गांधी शाळेजवळ असलेल्या जेएमएस बिझनेस सेंटर या इमारतीला आज, गुरुवार, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:५१ वाजता लेव्हल-३ (मोठी आग) ची भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठे नुकसान टळले, मात्र धुरामुळे अनेकजण अडकले होते.
ही आग इमारतीच्या ९ व्या ते १३ व्या मजल्यावरील विविध कार्यालयांमध्ये पसरली होती. इलेक्ट्रिक वायरिंग, फॉल्स सीलिंग, दरवाजे, खिडक्या, एसी डक्ट, कार्यालयीन नोंदी, फर्निचर आणि संगणक यांसारख्या वस्तूंमध्ये आग पसरली. विशेषतः ४ थ्या ते १३ व्या मजल्यावरील इलेक्ट्रिक डक्टमध्ये आग लागल्यामुळे वरच्या मजल्यांवर मोठ्या प्रमाणात धूर (Smoke) साचला होता.
अग्निशमन दलाच्या जवानांनी हायड्रोलिक प्लॅटफॉर्म शिडी आणि जिन्याच्या साहाय्याने अडकलेल्या २७ जणांची (२ महिला आणि २५ पुरुष) सुखरूप सुटका केली. धुरामुळे निर्माण झालेली घुसमट कमी करण्यासाठी जवानांना काही काचेचे दर्शनी भाग तोडावे लागले. दुपारी २:२० वाजता आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली.
जखमी आणि रुग्णालयात दाखल झालेले नागरिक
सुटका करण्यात आलेल्यांपैकी १७ जणांना धुरामुळे त्रास झाल्याने तातडीने जोगेश्वरी येथील एचबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, यापैकी ९ जणांना पुढील उपचारांसाठी दाखल करून घेण्यात आले आहे, तर ८ जणांनी प्राथमिक उपचार घेऊन घरी जाणे पसंत केले.
रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची नावे
फैजल काझी - ४२/पुरुष
श्याम बिहारी सिंग - ५८/पुरुष
मेहराज कुरेशी - १९/महिला
इकबाल धेनकर - ६१/पुरुष
नदीम भाटी - ४३/पुरुष
वसीम खान - २८/पुरुष
मृदुला सिंग - ५७/महिला
सलीम जावेद - ४८/पुरुष
अबू भाटी - ६०/पुरुष
प्राथमिक उपचार घेऊन घरी गेलेल्यांची नावे
नझाराम शेख - २५/पुरुष
नझीर शेख - ३८/पुरुष
ताहिरा शेख - ३२/महिला
प्रणिल शाह - २१/पुरुष
जिग्नेश शाह - ५०/पुरुष
निशित शाह - ५१/पुरुष
शकील शेख - ५३/पुरुष
मोहम्मद कैफ - २१/पुरुष