मुंबई : मुंबईसह सर्व उपनगरात मेट्रोचे जाळे पसरले आहे. काही प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे तर काही मेट्रो प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. त्यातील एक प्रकल्प म्हणजे मुंबई मेट्रो १२ या मेट्रोमुळे कल्याण आणि तळोजा ही दोन शहरे जोडण्यात येणार आहेत. मेट्रो १२ चे काम सध्या प्रगतीपथावर असून या मेट्रोमुळे नवी मुंबई शहर ठाण्याला जोडले जाणार आहे. मेट्रो १२ प्रकल्प ही ऑरेंज मार्गिका असून मेट्रो ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) चा विस्तारीत प्रकल्प आहे.
गेल्या वर्षीच या मेट्रोचे भूमीपूजन पार पडले होते. तर सध्या पिलर्सची उभारणी झाली आहे. भूमीपूजन झाल्यानंतर एका वर्षांतच मेट्रोचे खांब उभे केले आहेत. मुंबई मेट्रो १२ चे काम सुपरफास्ट होत आहे. मुंबई मेट्रो १२ हा प्रकल्प पूर्णपणे उन्नत असेल. या प्रकल्पाची एकूण लांबी २२.१७ किमी असेल, तर या मार्गिकेवर १९ स्थानके असणार असून, एपीएमसी कल्याण ते अमनदूत तळोजा अशी ही मार्गिका असणार आहे.
या मार्गिकेल २ इंटरचेंज असणार आहे. पहिली मुंबई मेट्रो लाइन ५ वरील कल्याण एपीएमसी. दुसरा म्हणजे नवी मुंबई मेट्रो लाइन १ वरील अमनदूत तळोजा येथे कनेक्ट होईल. या मेट्रोमुळे कल्याण डोंबिवली ते नवी मुंबईचा प्रवास फक्त ४५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. २०२७ पर्यंत ही मेट्रो मार्गिका सेवेत येणार आहे.
अशी असतील स्थानके
कल्याण, कल्याण एपीएमसी, गणेश नगर, पिसावली, गोलवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाकलन, तुर्भे, पिसार्वे डेपो आणि तळोजा.