Thursday, October 23, 2025
Happy Diwali

गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द

गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द

पुणे : गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. पासपोर्ट प्रदेश कार्यालयाने हा आदेश जारी केला आहे. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसेच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळ बाबत अहवाल सादर केला होता. यानंतर पासपोर्ट प्रदेश कार्यालयाने घायवळचा पासपोर्ट रद्द केल्याचा आदेश काढला आहे. पासपोर्ट रद्द झाल्यामुळे गुंड निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या आहेत.

घायवळने खोटी माहिती देऊन, बनावट कागदपत्रे सादर करुन पासपोर्ट काढला होता. याच पासपोर्टच्या मदतीने तो परदेशात फरार झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. या पार्श्वभूमीवर घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.

गुंड निलेश घायवळने Ghaywal या नावातील h काढून Gaywal असे केले. यानंतर त्याने गायवळ या नावाने अहिल्यानगरमधील खोटा पत्ता दाखवत 23 डिसेंबर 2019 रोजी तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज केला होता. पासपोर्ट मिळाल्यानंतर त्याचा वापर करुन तो फरार झाला, असे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी पुरावे सादर केल्यानंतर पासपोर्ट प्रदेश कार्यालयाने घायवळचा पासपोर्ट रद्द केला. जो पासपोर्ट १६ जानेवारी २०२० रोजी गायवळ या नावाने देण्यात आला तो पासपोर्ट तातडीने पुणे पोलिसांकडे अथवा पासपोर्ट प्रदेश कार्यालयाकडे जमा करावा, असेही पासपोर्ट प्रदेश कार्यालयाच्या आदेशात नमूद आहे.

घायवळवर पुण्यात सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करणे, कायद्याचे उल्लंघन करणे, दरोडा टाकणे असे विविध गंभीर गुन्हे नोंदवले आहेत. पुणे पोलीस सध्या फरार असलेल्या गुंड निलेश घायवळला शोधत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >