नवी दिल्ली : ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याला बुधवारी भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल या मानद पदाने सन्मानित करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत दिल्लीतील समारंभात हा गौरव सोहळा पार पडला. नीरजच्या अॅथलेटिक्समधील कामगिरीची आणि लाखो तरुणांना दिलेल्या प्रेरणेची दखल घेऊन त्याला हा सन्मान देण्यात आला.
नीरज चोप्रा आता देशासाठी सुवर्ण कामगिरी करणाऱ्या आणि सशस्त्र दलात मानद पद प्राप्त करणाऱ्या निवडक खेळाडूंच्या गटात सामील झाला आहे. या समारंभाला भारतीय लष्कर व प्रादेशिक सैन्याचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नीरजने २६ ऑगस्ट २०१६ रोजी नायब सुभेदार पदावर ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर म्हणून भारतीय सैन्यात प्रवेश केला होता. दोन वर्षांनंतर, त्याला अॅथलेटिक्समधील उल्लेखनीय कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर २०२१ मध्ये, त्याला देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान खेलरत्न पुरस्कार मिळाला
टोकियो २०२० ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरजला २०२२ मध्ये परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. त्याच वर्षी त्याला सुभेदार मेजर पदावर बढती मिळाली आणि भारत सरकारने त्याला पद्मश्री पुरस्काराने गौरवले.
२७ वर्षीय नीरज चोप्रा हा केवळ एक आंतरराष्ट्रीय विजेता नाही, तर देशातील तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे. आता लष्करात मिळालेल्या मानद पदामुळे त्याच्या कार्याचा सन्मान अधिक उंचावला आहे.