वाराणसी: कोलकाता येथून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाला आज बुधवारीइंधन गळतीमुळे वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे विमानातील सर्व १६६ प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरूप आहेत.
इंडिगो फ्लाईट क्रमांक 6E-6961 ही कोलकाता येथून श्रीनगरसाठी निघाली होती. विमान हवेत असतानाच वैमानिकाला विमानातील इंधन टाकीतून इंधन गळती होत असल्याचा संशय आला. वैमानिकाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ वाराणसी येथील एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क साधला आणि आपत्कालीन लँडिंगची मागणी केली.एटीसीकडून परवानगी मिळाल्यानंतर, वैमानिकाने सायंकाळी सुमारे ४:१० वाजता विमान वाराणसी विमानतळाच्या धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरवले.
विमान सुरक्षितपणे उतरवल्यानंतर तातडीने सर्व १६६ प्रवासी आणि क्रू मेंबर्सला विमानातून बाहेर काढण्यात आले आणि विमानतळाच्या आगमन विभागात सुरक्षितपणे बसवण्यात आले. कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विमानाची तपासणी करण्यासाठी ते 'ग्राउंड' करण्यात आले आहे आणि प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी (श्रीनगर) पोहोचवण्यासाठी दुसऱ्या पर्यायी विमानाची व्यवस्था इंडिगो एअरलाईन्सकडून केली जात आहे.
इंडिगो एअरलाईन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, "तांत्रिक कारणामुळे विमानाने वाराणसी विमानतळावर खबरदारीचा उपाय म्हणून लँडिंग केले. आमच्या प्रवाशांची आणि क्रूची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे."