सौंदर्य तुझं : प्राची शिरकर
फक्त प्रेम, सन्मान आणि आपुलकीचा
दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश, प्रेम आणि एकत्रतेचा सण. या दिवशी प्रत्येक घर दिव्यांनी उजळून निघतं, पण खरी रोषणाई होते ती मनांतील ऊब, स्नेह आणि नात्यांतील जिव्हाळ्याने. दिवाळीतील पाडवा हा दिवस विशेष मानला जातो, कारण हा दिवस फक्त ‘भाऊबीज’च्या उत्साहात नव्हे तर पति-पत्नीच्या नात्याचा सण म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी नवरा आपल्या पत्नीस सन्मान, प्रेम, भेटवस्तू देतो आणि पत्नी नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. हा दिवस म्हणजे दोन जीवांमधील नात्याला नव्याने उजाळा देण्याची संधी म्हणूनच, प्रत्येक स्त्रीच्या मनात या दिवशी काही खास, मनापासूनच्या अपेक्षा असतात. त्या फक्त भौतिक नसतात, तर भावनिकही असतात. चला, पाहूया पाडव्या दिवशी महिलांना नवऱ्याकडून कोणत्या अपेक्षा असतात आणि त्या कशा पूर्ण करता येतात.…
१. प्रेम, सन्मान आणि ओळखीची अपेक्षा
स्त्रीला सर्वात मोठी भेट असते ओळख आणि आदराची. संपूर्ण वर्षभर ती घर, नातेसंबंध, मुलं आणि जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेली असते. पण या दिवशी तिच्या प्रयत्नांना नवऱ्याने थोडं कौतुकाने ओळख दिली, “तू सगळं इतकं सुंदर सांभाळतेस”, किंवा “तुझ्याशिवाय हे घर असं उजळलं नसतं”, एवढं म्हणणंही तिच्यासाठी सोन्याहून पिवळं असतं. या छोट्या क्षणांतच तिला सगळ्या जगाचं सुख सापडतं.
२. विचारपूर्वक दिलेली भेटवस्तू
पाडव्या दिवशी भेट देणं ही केवळ परंपरा नाही, तर प्रेम व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. महिलांना भेटवस्तूच्या किमतीपेक्षा तिच्यामागचा विचार आणि भावना जास्त महत्त्वाच्या वाटतात. तुम्ही तिच्या आवडीचा विचार करून दिलेलं काहीही तिच्यासाठी मौल्यवान ठरतं. उदा, तिच्या आवडीची साडी किंवा डिझायनर ड्रेस, गोल्ड/सिल्व्हर ज्वेलरी, सुगंधी परफ्यूम, हाताने लिहिलेलं प्रेमळ कार्ड, मोगऱ्याचा गजरा, स्पा सेशन किंवा ब्यूटी पार्लर वाऊचर, हॉटेलमध्ये एक रोमँटिक डिनर डेट, दोघांनी एकत्र छोटंसं ट्रिप प्लॅन करणं, किंवा घरच्या घरी सजवलेलं कॅन्डललाइट डिनर या सगळ्या भेटवस्तू तिच्या मनात कायमस्वरूपी आठवण बनतात. कारण भेट म्हणजे वस्तू नव्हे, त्या क्षणात गुंफलेलं प्रेम असतं.
३. संवाद आणि एकत्र वेळ घालवणं
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात संवाद हा सर्वात मौल्यवान गिफ्ट ठरतो. महिलांना पाडव्या दिवशी नवऱ्याकडून सर्वात जास्त अपेक्षा असते एकत्र वेळ घालवण्याची. मोबाईल, काम, आणि बाहेरील जग काही वेळ बाजूला ठेवा आणि फक्त तिच्यासोबत वेळ घालवा. एक कप चहा घेऊन गप्पा मारणं, जुनी आठवण काढणं, हसणं, फोटो पाहणं हे क्षण तिच्या मनात कायमस्वरूपी साठतात. कारण स्त्रीला “साथ” हवी असते हाच शब्दांपेक्षा मौनातला आधार असतो.
४. कृतज्ञतेची भावना आणि थोडं सहकार्य
दिवाळीच्या तयारीत घरातली प्रत्येक स्त्री दिवस-रात्र झटत असते. साफसफाई, सजावट, फराळ सगळं तिच्यामुळे शक्य होतं. म्हणूनच पाडव्या दिवशी नवऱ्याने तिच्या मेहनतीचं कौतुक करणं. याचबरोबर घरकामात थोडी मदत करणं, उदा. फराळ मांडायला हात देणं किंवा तिच्यासोबत दिवे लावणं ही छोटीशी कृती तिच्या मनात आदराची भावना वाढवते.
५. भावनिक आधार आणि ऐकून घेण्याची सवय
कधी कधी स्त्रीला भेटवस्तूंपेक्षा नवऱ्याच्या भावनिक उपस्थितीची गरज असते. फक्त तिच्या भावना ऐकून घेणं, तिचं मन समजून घेणं इतकंच पुरेसं असतं. त्या दिवशी काही क्षण तिच्या जवळ शांत बसणं, तिचा हात हातात घेणं, किंवा “मी तुझ्यासोबत आहे” एवढं म्हणणंही तिच्यासाठी शब्दांपलीकडचं सुख असतं.
पाडवा म्हणजे केवळ भेटवस्तू देण्याचा दिवस नाही तो नातं नव्याने उजळवण्याचा, एकमेकांना समजून घेण्याचा आणि प्रेमाने जोडण्याचा दिवस आहे. स्त्रीला फक्त भेटवस्तू नाही, तर आपुलकी, सन्मान आणि वेळ हवा असतो. या दिवशी तिला जाणवू द्या की ती तुमच्यासाठी किती खास आहे कारण स्त्रीचाच सन्मान म्हणजेचं कुटुंबाची शान…...