
नवी मुंबई: नवी मुंबईतील कामोठे परिसरात एका घरात लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच दोघांचा जीव गेला होता.
कामोठे, सेक्टर 36 मधील आंबे श्रध्दा सहकारी सोसायटीत ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली आणि तिचा भडका उडाला. आगीमुळे घरात अडकलेल्या आई आणि मुलीला बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आग विझवल्यानंतर तपासणी केली असता घरात अडकलेल्या आई आणि मुलीचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.