How To Control Bad Cholesterol: आजच्या धावपळीच्या आणि असंतुलित आहाराच्या जीवनशैलीमुळे अनेकांना आरोग्यविषयक समस्या भेडसावत आहेत. त्यातलाच एक मोठा धोका म्हणजे शरीरात वाढणारी खराब कोलेस्टेरॉलची (LDL) पातळी. तेलकट, तिखट आणि जंकफुडच्या अति सेवनामुळे रक्तातील LDL वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. पण या समस्येवर घरगुती आणि नैसर्गिक उपाय म्हणून दही आणि अळशीच्या बियांचे सेवन अतिशय परिणामकारक ठरते.
अळशीच्या बियांमध्ये विघटनशील फायबर असते, जे आतड्यांमधील खराब कोलेस्टेरॉल शोषून घेतं आणि ते शरीरातून बाहेर टाकण्यास मदत करतं. तसेच, अळशीमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते, जे हृदयाचे आरोग्य टिकवून ठेवतं आणि शरीरातील सूज कमी करतं. या बियांमध्ये असलेले लिग्नन्स कम्पाउंड अँटी-ऑक्सिडंट्सने भरलेले असते, जे रक्तातील चरबीचे प्रमाण संतुलित ठेवते आणि खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.
दुसरीकडे, दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पचनक्रिया सुधारतात आणि आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांचे संतुलन राखतात. दही आणि अळशी एकत्र सेवन केल्यास शरीरातील चांगले कोलेस्टेरॉल (HDL) वाढते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
सेवनाची पद्धत:
थोड्या अळशीच्या बिया तव्यावर हलक्या भाजून घ्या. नंतर त्यांची बारीक पावडर करून ठेवा. दररोज एक वाटी ताज्या दह्यामध्ये एक ते दोन चमचे अळशी पावडर मिसळा आणि सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारी सेवन करा. नियमित सेवन केल्यास काही आठवड्यांत कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहतो आणि शरीर हलकं, ताजेतवाने वाटतं.
नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि या घरगुती उपायाचा समावेश केल्यास हृदयाचे आरोग्य दीर्घकाळ चांगले राखता येते.