शिंपोलीत फटाक्याच्या रॉकेटमुळे चार दुकानांना आग
मुंबई : मुंबईत यंदा दीपावलीच्या सणानिमित्त केल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजींमुळे आगीच्या दुघर्टना घडण्याची शक्यता लक्षात घेता अग्निशमन दलाच्या माध्यमातून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फटाके फोडण्यासाठी काय काळजी घेतली जावी याबाबतची मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. तरीही फटाके फोडताना नागरिकांकडून काळजी घेतली जात नसून रॉकेटमुळे शिंपोली मेगा पार्टी हॉलसमोरील मॉर्डन ग्लास हाऊस येथे आग लागण्याची दुघर्टना घडली. यात कुठलीही जिवित हानी झाली नसली तरी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या काळात सर्वाधिक आगीच्या घटना घडत असून मागील २२ महिन्यांमध्ये तब्बल १८२ अशा प्रकारच्या घटना घडल्याची आकडेवारी समोर येत आहे.
बोरिवली शिंपोली येथे एका फटाक्याचे रॉकेट जवळच्या दुकानाजवळ पडले आणि यामुळे लागलेल्या आगीमध्ये चार दुकानांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवण्याचे कार्य हाती घेतल्याने ही आग पुढे पसरली नाही. मुंबई अग्निशमन दल, आणि पोलीस विभागाच्या तत्परतेमुळे आणि समन्वयामुळे आग शेजारच्या द्वारका हॉटेलपर्यंत पोहोचण्यापूर्वीच आटोक्यात आणण्यात आली, असे स्थानिक भाजपचे माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी सांगितले. मुंबईत दिवाळीच्या सणामध्ये फटाक्यांची आतषबाजी केली जात असल्याने उडणाऱ्या फटाक्यांच्या सुरक्षिततेचे पालन करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे बनवली आहे. त्यामुळे फटाक्यातील रॉकेट फोडताना रॉकेटसाठी स्थिर आणि सरळ बाटली किंवा पीव्हीसी पाईपच्या माध्यमातून योग्य स्टँड वापरले जावे अशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे या दिवाळीचा सणामध्ये सोमवारपर्यंत फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात २७ फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या घटना घडल्या होत्या, तर नोव्हेंबर २०२४ रोजी ११३ दुघर्टना घडल्या होत्या. त्यामुळे मागील २२ महिन्यांमध्ये फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या तब्बल १८२ घटना घडल्या आहेत. मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी यंदाची दिवाळी अग्निसुरक्षेच्या दृष्टिकोनातून चांगली जावी याकरता नागरिकांनी उडणाऱ्या फटाक्यांबाबत अग्निशमन दलाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे लहान मुलांनी एकट्याने फटाके फोडण्याऐवजी प्रौढ व्यक्ती सोबत असतानाच फटाके फोडावे असे स्पष्ट केले आहे.