नवी दिल्ली : प्रवासाची उत्तम सोय आणि आराम देणारा, फास्टटॅगचा वार्षिक पास या सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी एक परिपूर्ण भेट असू शकतो जो देशभरातील राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगती महामार्गांवर वर्षभर त्रासमुक्त प्रवास करण्यास सक्षम करतो. हा वार्षिक पास राजमार्गयात्रा ॲपद्वारे आपल्या प्रियजनांना भेट म्हणून दिला जाऊ शकतो.
ॲपवरील 'पास द्या (ॲड पास)’ या पर्यायावर क्लिक करून, वापरकर्ता ज्या व्यक्तीला फास्टटॅग वार्षिक पास भेट देऊ इच्छितो; त्याचा वाहन क्रमांक आणि संपर्क तपशील जोडू शकतो. सोप्या OTP पडताळणीनंतर वार्षिक पास त्या वाहनाशी जोडलेल्या फास्टटॅगवर सक्रिय होईल. फास्टटॅग वार्षिक पास राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना एक अखंड आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय प्रदान करतो आणि तो संपूर्ण भारतातील सुमारे 1,150 टोल प्लाझांवर स्वीकारला जातो.
वार्षिक पासच्या एका वर्षाच्या वैधतेसाठी किंवा 200 टोल प्लाझा क्रॉसिंगसाठी 3000 रुपये शुल्क एकदाच भरल्यानंतर वारंवार फास्टटॅग पुनर्भरण (रिचार्ज) करण्याची आवश्यकता नाहीशी होते. हा पास वैध फास्टटॅग असलेल्या सर्व गैर-व्यावसायिक वाहनांसाठी लागू आहे. राजमार्गयात्रा अॅपद्वारे एकदाच शुल्क भरल्यानंतर वाहनाशी जोडलेल्या विद्यमान फास्टटॅगवर वार्षिक पास दोन तासांच्या आत सक्रिय होतो.
15 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासने पंचवीस लाख वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला आहे आणि सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत आणि अखंड प्रवासाचा उत्तम अनुभव देतो, हे अधोरेखित होते.