मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर आणि 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाणारी स्मृती मानधना लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या आणि प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक-चित्रपट निर्माता पलाश मुच्छल यांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चांना आता खुद्द पलाशनेच पूर्णविराम दिला आहे.
पलाश मुच्छलने केली घोषणा
पलाश मुच्छल नुकताच इंदूरमध्ये आपल्या आगामी 'राजू बाजे वाला' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आला होता. यावेळी इंदूरच्या एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना त्याला स्मृती मानधनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर पलाशने थेट उत्तर न देता, एक सूचक विधान केले, "ती (स्मृती मानधना) खूप लवकर इंदूरची सून होईल! मला फक्त एवढंच सांगायचं आहे." त्याच्या या स्पष्ट पण अप्रत्यक्ष घोषणेनंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.
स्मृती मानधना मूळची महाराष्ट्रातील सांगलीची असून, ती आता इंदूरमध्ये स्थायिक असलेल्या पलाश मुच्छलच्या कुटुंबाची सून होणार आहे. या दोघांच्या नात्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडिया आणि मनोरंजन तसेच क्रीडा जगतात सुरू होती. ते दोघे सुमारे पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
पलाश मुच्छल कोण आहे?
पलाश मुच्छल हा एक बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार, गायक आणि चित्रपट निर्माता आहे. तो सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छल हिचा भाऊ आहे. त्याने 'ढिश्कियाऊं' या चित्रपटातून संगीतकार म्हणून पदार्पण केले. 'भूतनाथ रिटर्न्स'मधील "पार्टी तो बनती है" सारखे हिट गाणे त्याने संगीतबद्ध केले आहे. कामाच्या बाबतीत, तो सध्या 'राजू बाजे वाला' या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. पलाश बॉलिवूडमधील सर्वात तरुण संगीतकारांपैकी एक आहे, त्याने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.
क्रिकेट-बॉलिवूडचे जुने नाते
भारतीय क्रिकेट आणि बॉलिवूड किंवा संगीत क्षेत्रातील नात्यांची परंपरा जुनी आहे. स्मृती आणि पलाश यांच्यामुळे या नात्याच्या यादीत आणखी एका नवीन 'पॉवर कपल'ची भर पडणार आहे.
पलाशने लग्नाची घोषणा केली असली तरी, त्यांनी अद्याप लग्नाची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. स्मृती मानधना सध्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तयारीमध्ये व्यस्त आहे आणि १९ ऑक्टोबर रोजी इंदूरमध्ये इंग्लंडविरुद्ध सामना खेळणार आहे. त्यामुळे, चाहत्यांना आता हे सुंदर जोडपे कधी आणि कोणत्या तारखेला विवाहबंधनात अडकणार, याची उत्सुकता लागली आहे.