मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेतील अभियंत्याच्या बदलीत मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होत असल्याने याबाबत भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी २३ ऑगस्ट २०२५ रोजी महापालिका आयुक्तांना निवेदन देवून याबाबत त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, आयुक्तांनी या प्रकरणात काहीही लक्ष न घातल्याने अखेर अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी मंजुरी दिलेल्या १२२ तसेच ३४ अभियंत्यांच्या बदलीलाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती देण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले. त्यामुळे महापालिकेतील १५६ अभियंत्यांच्या बदलीलाच स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आयुक्तांनी यापूर्वीच लक्ष घातले असते तर अभियंत्यांच्या बदलीला स्थगिती देण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली नसती,अशी चर्चा आता अभियंत्यांमधून ऐकायला येवू लागली आहे.
भाजपाचे मुंबई अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी २३ ऑगस्ट २०२६ रोजी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनामध्ये महापालिका अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी चालवलेल्या बदली घोटाळ्याकडे आयुक्तांचे लक्ष वेधून घेतले होते. अमित साटम यांनी आपल्या निवेदना असा आरोप केला होता की, अतिरिक्त आयुक्त अमित सैनी गट पदोन्नतीसह विविध श्रेणीतील अभियंत्यांच्या बदल्यांसाठी लाखो रुपये घेत असल्याची तक्रार केली होती. काही कंत्राटदारांनी अमित सैनी यांना सांभाळून काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांची सुपारी घेतल्याचीही उदाहरणे असल्याचेही त्यांनी या निवेदनात म्हटले होते. तुमचा सरळमार्गी आणि पारदर्शक दृष्टिकोन जाणून घेऊन, मी आपण त्वरित याकडे लक्ष देण्याचे आवाहन करत याप्रकरणी चौकशी सुरू करून अमित सैनी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती. मात्र, साटम यांच्या तक्रारीनंतर महापालिका आयुक्तांनी कोणतेही पाऊल उचलले नाही किंवा त्यांच्याकडील त्या विभागाचा पदभार काढून घेतला नाही.
दरम्यान, आयटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनीही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून मुंबई महापालिकेतील बदल्यांचा बाजार तात्काळ थांबवावा अशी मागणी केली. अमित सैनी यांच्या अखत्यारित १२२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून आणखी १०० बदल्या प्रक्रियेत आहे. ज्यामुळे महापालिकेत गोंधळ निर्माण होण्याची भीती त्यांनी वर्तवली होती. त्यामुळे आधी अमित साटम यांचे पत्र आणि त्यानंतर गलगली यांचे पत्र याची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरीत या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले. सैनी हे बिहार निवडणुकीकरता जाण्यापूर्वी त्यांनी १२२ बदलीच्या ऑर्डरवर अत्यंत घाईघाईत स्वाक्षरी केली होती. त्यामुळे अभियंत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून आजवर या बदल्या केवळ आर्थिक देवाणघेवाणीतूनच रोखून ठेवण्यात आल्या होत्या, परंतु आता स्थगिती मिळाल्याने बदलीची शक्यताच पूर्णपणे मावळली गेली आहे