क्राइम : अॅड. रिया करंजकर
उद्योगधंदे व कामाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील तरुणाई शहराकडे ओढली जात आहे आणि शहरांमध्येच आपल्या उदरनिर्वाहाचं साधन शोधलं जात आहे. यामुळे गाव गावाकडचं घर आणि गावाकडची जमीन या सर्वांकडे तरुणाईचं दुर्लक्ष होत चाललेलं आहे
संतराम आणि त्याचं कुटुंब असं शहरांमध्ये कामानिमित्त आलं आणि या शहरांमध्ये स्थायिक झालं. गावाकडे सणासुदीलाच येणं जाणं होतं नाही तर नाही. त्याचे आई-वडील गावी होते आणि ते शेतीचे काम बघत होते. शेतही भरपूर होतं. शांतारामने ते कसलं असतं तर पीकही भरपूर मिळालं असतं पण त्याने शहराचा मार्ग निवडला. एक दिवस शांतारामचा मित्र रामा धावत त्याच्या घरी आला आणि त्याने वर्तमानपत्रात आलेली जाहिरात दाखवली. त्यामध्ये त्यांच्या गावाचं नाव होतं आणि सातबाराचं नाव होतं, ही जमीन विकली जाणार आहे आणि याचा मालक रफिक नावाचा एक व्यक्ती आहे असं त्या जाहिरातीमध्ये होतं.
हा रफिक आता ती जमीन विकणार आहे, अशी ती जाहिरात होती. रामा शांतारामकडे यासाठी धावत आला होता की, जो सातबारा नंबर त्या रफिकने त्याच्यावर नमूद केला होता ती शांताराम याच्या वडिलांची जमीन होती. रामाला याबद्दल कसं माहिती तर त्याच्या बाजूलाच रामाची जमीन होती. शांतारामने वडिलांकडे सातबाराच्या नंबरची चौकशी केली. त्यावेळी त्याला कळलं की तो सातबारा नंबर त्यांचाच आहे. म्हणून गावाकडे आणि शहराकडे पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आणि चौकशी केल्यानंतर असं समजलं की रफिकला ही जमीन सुरेश नावाच्या माणसाने विकली होती. सगळी कागदपत्रं तपासल्यानंतर असं समजलं की स्वतःचं आधार कार्ड दाखवून आपणच शांताराम आहोत आणि आपली जमीन आहे आणि त्या आधार कार्डच्या मार्फतच बँकेमध्ये अकाउंट चालू केलं गेलं. आधार कार्डवर फोटो मात्र सुरेशचा होता, नाव शांतारामचं होतं. त्यामुळे घेणाऱ्या रफिकला ही ती जमीन या आधार कार्ड मधल्याच व्यक्तीची आहे असं वाटलं कारण सातबारावर शांतारामचं नाव होतं आणि रफीक यांनी ती रक्कम सुरेश याने जे शांताराम नावाचं अकाउंट खोललेलं होतं त्याच्यावर पाठवलेली होती. आणि ही जमीन आता आपली आहे म्हणून ती आपण जाहिरातीद्वारे विकत आहोत असं रफिक याने सांगितलं. मुळात म्हणजे मूळ मालक जिवंत आहे आणि त्याची ती जमीन आहे आणि तोही त्याच गावातला आहे. सुरेशने आधार कार्डवर स्वतःचाच फोटो ठेवून शांताराम याचं नाव लावून घेतलं आणि त्याच्यामुळे हा जमिनीचा व्यवहार झाला आणि मूळ मालकाला याचा काही थांगपत्ताच लागला नाही. सुरेशने जमीन मालक आणि रफिक या दोघांची फसवणूक केलेली होती. रफिकला आधार कार्डवरून तोच मूळ मालक असणार असं वाटलं होतं. कारण रफीक दुसऱ्या शहरात राहत होता. पुढे ही जमीन उपयोगी पडेल म्हणून त्याने कमी भावामध्ये मिळत असलेली सदर जमीन विकत घेतली होती. हे जर रामाने जाहिरात पाहिली नसती तर रफिककडून ती तिसऱ्याच माणसाला विकली गेली असती. पोलीस खाते आता सुरेश याने अशा प्रकारे अनेक व्यवहार केले आहेत का याची चौकशी करत आहे. गावाकडे एखादे कुटुंब जमिनीकडे लक्ष देत नसेल तर असे गावगुंड त्यांची जमीन अशा पद्धतीने हडप करण्याचा मार्ग अवलंबत आहेत. रफिकने जाहिरात दिली नसती तर ही गोष्ट कोणालाच कळली नसती. रफिक सोबत आणखी एकाची फसवणूक झाली असती. कारण शांतारामचा आधार नंबर हा वेगळा होता आणि सुरेशचा आधार नंबर वेगळा होता. पण सुरेश याने नाव सारखं केल्यामुळे हा क्राईम होऊ शकला.
(सत्यघटनेवर आधारित)