
कल्याण : कल्याण - डोंबिवली महापालिकेची स्मार्ट सिटी प्रकल्पात निवड झाल्यानंतर कल्याण स्टेशन परिसरात वाहतूक सुधारणा प्रकल्पाच्या कामास वेग आला आहे. मुरबाड रस्त्यावरील सुभाष चौक ते बैलबाजार चौक दरम्यान १६३० मीटरचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीत भूसंपादन, एसटी स्थानकाच्या जागेवर काम करण्यास लागणारी ना हरकत, रेल्वेची जागा, हॉटेल्सची बांधकामे, गाळे धारकांचे पुनर्वसन यासारख्या तांत्रिक अडचणीमुळे हे काम रखडले होते. आता यातील १३४६ मीटरचे काम पूर्ण झाले असून अडथळे दूर झाल्याने उर्वरित काम देखील वेगाने पूर्ण करणे शक्य होऊ शकेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
कल्याण रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या वाहतूक सुधारणा प्रकल्पातील उड्डाणपुलाचे काम केव्हा पूर्ण होणार याकडे वाहतूककोंडीने ग्रासलेल्या नागरिकांचे लक्ष आहे. या उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री १२ .३० वाजल्यापासून पहाटे २ वाजेपर्यंत गर्डर बसवण्याचे काम करण्यात आले. कल्याण - डोंबिवली महापालिकेने पूल लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध केला जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे कल्याण मधील नागरिकांचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे