पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे झाला. हा सामना ऑस्ट्रेलियाने सात विकेट राखून जिंकला.
पावसाचा वारंवार आलेला व्यत्यय आणि भारताच्या स्टार फलंदाजांचा फ्लॉप शो यामुळे या सामन्याची सोशल मीडियात भरपूर चर्चा सुरू आहे. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे ऑस्ट्रेलियासाठी या सामन्यात फायद्याचे ठरले आहे.
वारंवार पावसाचा व्यत्यय आल्यामुळे पर्थमध्ये ५० ऐवजी कमी षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय झाला. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाने २१.१ षटकांत तीन विकेट गमावून १३१ धावा केल्या आणि सामना सात विकेट राखून जिंकला.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने नाबाद ४६ धावा केल्या. ट्रॅव्हिस हेड आणि मॅथ्यू शॉर्ट हे दोघे प्रत्येकी आठ धावा करुन बाद झाले. जोश फिलिप ३७ धावा करुन बाद झाला. मॅट रेनशॉने नाबाद २१ धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंह, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी एक बळी घेतला.
याआधी भारताने २६ षटकांत नऊ बाद १३६ धावा केल्या. भारताचे स्टार फलंदाज असलेले रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल हे पुरते अपयशी ठरले. रोहित शर्माने ८, शुभमन गिलने १०, विराट कोहलीने शून्य, श्रेयस अय्यरने ११, अक्षर पटेलने ३१, केएल राहुलने ३८, वॉशिंग्टन सुंदरने १०, नितीश रेड्डीने नाबाद १९, हर्षित राणाने एक, अर्शदीप सिंहने शून्य (धावचीत), मोहम्मद सिराजने नाबाद शून्य धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून हेझलवूड, ओवेन आणि कुह्नेमनने प्रत्येकी दोन तर स्टार्क आणि एलिसने प्रत्येकी एक विकेट घेतली.
सामनावीर : मिचेल मार्श