मुंबई : आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन डिलिव्हरी ही आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली आहे. Zepto, Zomato, Amazon, Myntra यांसारख्या कंपन्या तुमच्या दारापर्यंत वस्तू 10 मिनिटांत पोहोचवण्याचं वचन देतात. पण या जलद सेवेमागे दिवसरात्र मेहनत करणाऱ्या डिलिव्हरी बॉईजचा संघर्ष आणि त्यांची कमाई याबद्दल फार कमी लोकांना माहिती असते.
ऑनलाईन शॉपिंगच्या वाढत्या प्रचलनामुळे डिलिव्हरी बॉईज हे ग्राहक आणि कंपनी यांच्यातील सर्वात महत्त्वाचे दुवे ठरले आहेत. ते पावसात, उन्हात, ट्रॅफिकमध्ये वेळेवर पार्सल पोहोचवण्यासाठी झटत असतात. एका दिवशी ते 80 ते 100 पार्सल वितरित करतात. पण यामध्ये जोखीमही तितकीच असते एखादे पार्सल हरवले किंवा खराब झाले तर त्याची जबाबदारीही त्यांनाच घ्यावी लागते.
उदाहरणार्थ, Amazon कंपनी आपल्या डिलिव्हरी बॉईजना प्रति पार्सल मागे 12 रुपये देते. जर एखादा डिलिव्हरी बॉय दररोज 100 पार्सल वितरित करतो, तर त्याची दिवसाची कमाई साधारण 1,200 रुपये होते. त्यामुळे महिन्याला तो सुमारे 36,000 रुपये कमवू शकतो. मात्र, इंधनाचा खर्च, वाहनाची देखभाल आणि वेळेचा ताण यामुळे त्यातील शुद्ध नफा कमी राहतो.
डिलिव्हरी बॉय बनण्यासाठी इच्छुकांनी संबंधित कंपनीच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागतो. अर्ज सादर केल्यानंतर कंपनीकडून ओळखपत्र पडताळणी आणि पाच दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर उमेदवाराला विशिष्ट परिसरात पार्सल वितरणाचे काम दिले जाते.
एकंदरीत पाहता, ऑनलाईन डिलिव्हरी ही आधुनिक युगातील गरज असली तरी त्यामागे कार्यरत असलेल्या डिलिव्हरी बॉईजचा कष्टमय प्रवास हा खऱ्या अर्थाने या सेवांचा कणा आहे. त्यांच्या मेहनतीमुळेच आपल्या दारात 10 मिनिटांत सुविधा मिळतात.