मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
बेगुसराय : बिहारमधील जनता एनडीए सोबत आहे. पंतप्रधान मोदी यांचे बिहारवर आणि बिहारमधील लोकांचे पंतप्रधान मोदी यांच्यावर खूप प्रेम आहे. पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांची जादू संपूर्ण बिहारवर आहे. बिहारमधील एनडीएत सहभागी असलेले सर्व पक्ष आणि त्यांचे नेते एक चांगला विजय येथे साकारतील, असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी काही ठिकाणाच्या प्रचारसभेत सहभाग घेतला. बिहारमधील विरोधकांवर टीका करताना, फडणवीस म्हणाले की, हे महाठकबंधन आहे. जनतेलाही लुटत आहेत आणि आपल्या मित्रपक्षांनाही फसवत आहेत. वरवर कितीही दाखवत असले, तरी विरोधक आतून एकत्र नाहीत. कारण हे सगळे जण सत्तेच्या लालसेचे धनी आहेत. त्यांना बिहार आणि येथील जनतेशी काही देणे-घेणे नाही. त्यांना केवळ सत्तेशी मतलब आहे. हे कधीही एकत्र येणार नाही आणि एकत्र लढणार नाहीत. यांचा दारुण पराभव होणार आहे. बेगूसराय येथेही जाऊन आलो आणि तिथे प्रत्येक ठिकाणी केवळ एनडीएचीच चर्चा आहे,
असे ते म्हणाले.
बेगुसराय असो किंवा संपूर्ण बिहार असो, येथे एनडीएची जोरदार लाट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार पुन्हा एकदा एनडीएसोबत आहे. बिहारचे प्रेम पंतप्रधान मोदींवर काकणभर अधिक आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. बेगुसराय विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कुंदन कुमार यांच्या प्रचारासाठी बिहारमधील बेगुसराय येथे भाजपचा रोड शो झाला. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पटना साहिब विधानसभा भाजपचे उमेदवार रत्नेश कुशवाहा यांच्या प्रचारार्थ 'नामांकन व आशीर्वाद सभा' यामध्ये सहभाग नोंदवला. बिहार दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी पटना विमानतळावर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांची भेट घेतली.