मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे आता पक्षांतराला ही वेग येणार अशा चर्चा सुरु असताना राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे यश पाहून महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला. यामध्ये सर्वाधिक प्रवेश हे शिवसेना ठाकरे गटातून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात झाले. मात्र आता काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची मोठी बातमी समोर येत आहे.
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीत मुख्यमंत्र्यांसोबत पुढील निवडणुकीबाबत चर्चा झाली असे दिलीप माने यांनी म्हटले आहे. "परवा दिवशी आम्हाला निरोप आला. मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला वेळ दिली आहे. तुम्ही सायंकाळी सात साडेसातला या. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची आम्ही भेट घेतली", असे दिलीप माने यांनी म्हटले आहे. त्यामुळे माने भाजपमध्ये येणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान जर आमदार दिलीप माने यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यास, ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी हा काँग्रेसला मोठा धक्का असणार आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. लोकसभेत जरी महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांच्या पदरी पराभव आला असला तरी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने पुन्हा आपला जोर लावला आणि विजय संपादन केला. यामुळे राज्यातील नागरीकांची महायुती सरकारला असलेली पसंती ठळक झाली.महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये मिळालेले यश विधानसभा निवडणुकीत टिकवता आले न विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला.
दरम्यान विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीमधून अनेक नेत्यांनी महायुतीमध्ये येण्यास सुरुवात केली. यामध्ये सर्वाधिक प्रवेश हे शिवसेना ठाकरे गटातून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात झाले. तसेच नेते गमण्याचा फटका राष्ट्रवादी शरद पवार गटाला देखील बसला आहे. याचा पक्ष प्रवेशातून आता काँग्रेसही सुटणार नाही आहे. कारण, काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये पक्षांतर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.