भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या स्वछता आणि सोयीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता रेल्वेच्या बेडरोलमध्ये बेडशीट, पिलो कव्हर, टॉवेलसोबतच प्रवाशांना नवीन ब्लँकेट कव्हर मिळणार आहे. प्रवाशांची नेहमी तक्रार असायची की उशी आणि चादर नवीन मिळतात, पण ब्लँकेट दुसऱ्याने वापलेलेच मिळतात. ही अडचण दूर करण्यासाठी रेल्वेने ब्लँकेटसाठीही नवीन कव्हर देण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी जयपूरला खातीपुरा रेल्वे स्टेशनवर या नवीन सुविधेची सुरुवात केली. सध्या ही सेवा पायलट प्रोजेक्ट म्हणून जयपूर अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये सुरु करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी, रात्री ८:४५ वाजता जयपूरहून सुटणाऱ्या गाडीत प्रवाशांना पारंपरिक सांगानेरी प्रिंटचे नवीन ब्लँकेट कव्हर पॅकेटमध्ये देण्यात आले.
रेल्वेमंत्र्यांची घोषणा
अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वेतील ब्लँकेट अनेक वर्षांपासून वापरात आहेत, पण प्रवाशांचा संशय कायम होता. तो दूर करण्यासाठी ही नवीन सुविधा पायलट बेसिसवर सुरु झाली असून, याला यश मिळाल्यास ही सेवा इतर ट्रेन्समध्येही लागू केली जाईल.
यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत ६५ लहान व मध्यम स्टेशनवर प्लॅटफॉम उंची, लांबी आणि कव्हर वाढवणे, अपग्रेडेशन तसेच एकात्मिक प्रवासी माहिती प्रणाली यांचे लोकार्पणही केले. या सुधारणा प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित वातावरण निर्माण करतील.
या नवीन ब्लँकेट कव्हर सुविधेमुळे प्रवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल, तसेच रेल्वेच्या गुणवत्तेवर देखील सकारात्मक परिणाम होईल.