Thursday, November 13, 2025

अक्षय कुमारच्या डीपफेक व्हिडिओवर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, सोशल मीडियावरून व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश!

अक्षय कुमारच्या डीपफेक व्हिडिओवर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, सोशल मीडियावरून व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश!

मुंबई: आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा पर्याय सर्वांना सहज उपलब्ध असल्यामुळे त्याचा वापर वाढला आहे. त्यात सोशल मीडियामुळे कोणतीही गोष्ट वाऱ्यासारखी काही क्षणात पसरते. त्यामुळे एआयचा गैरवापर करून सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवण्याचे प्रकार वाढले आहेत. ज्यात अनेक सेलिब्रिटी अडकले जातात. बॉलिवूड स्टार अक्षय कुमार बाबतही हेच घडले. ज्यावर कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे.

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यात अक्षय महर्षी वाल्मिकींच्या वेशात दिसत होता. या खोट्या व्हिडीओनंतर अक्षयने न्यायालयात धाव घेतली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय कुमारच्या प्रतिमेचा व व्यक्तिमत्व हक्कांचा भंग करणारे डीपफेक व्हिडीओ आणि एआय कंटेंट तत्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अशा सामग्रीचा प्रसार करणाऱ्या अज्ञात व्यक्ती आणि काही ई-कॉमर्स साइट्सविरुद्ध कारवाईचे निर्देश दिले आहेत. यामुळे अक्षय कुमारला मोठा दिलासा मिळाला आहे.

डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अक्षयने त्याचा सोशल मीडिया खात्यावरून निवेदन केले होते. ज्यात तो म्हणाला होता की, एआयच्या मदतीने तयार केलेला व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात मला महर्षी वाल्मिकी म्हणून दाखवले आहे. पण हा व्हिडीओ पूर्णपणे खोटा आहे. माध्यमांनीही त्यावरून बातम्या केल्या, जे चुकीचे आहे. कृपया अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्याआधी त्याची सत्यता तपासा.

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स आणि इतर सोशल मीडिया कंपन्यांना हा व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. असे व्हिडिओ पुन्हा अपलोड होऊ नयेत यासाठी कडक देखरेख यंत्रणांनाही न्यायालयाने राबवली आहे. यापूर्वी अशा चुकीच्या डीपफेकचा फटका दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला बसला होता.

Comments
Add Comment