पोलादपूर :तालुक्यातील सर्वात उंचावरील 'महादेवाचा मुरा' येथील शिवछत्रपतींच्या स्वराज्यापूर्वीपासून प्रचिती येणाऱ्या स्वयंभू शिवमंदिरात भाविकांनी नवसपूर्तीनंतर बांधलेल्या घंटांची चोरी झाल्याची माहिती उघडकीस आली. पोलादपूर पोलीस ठाण्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करताच अज्ञात चोरट्यांकडून सर्व चोरलेल्या घंटा पुन्हा जागेवर ठेवण्यात येतील काय, असा प्रश्न 'महादेवाचा मुरा' येथील ग्रामस्थांसमोर निर्माण झाला आहे.
पोलादपूर तालुक्यातील सर्वात उंचावरील स्वयंभू शिवमंदिर असलेल्या महादेवाचा मुरा या तिर्थक्षेत्र असलेल्या क वर्गातील पर्यटन दर्जा मिळालेल्या आणि आदिवासी खेडे म्हणून महसूली ओळख प्राप्त होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या 'महादेवाचा मुरा' येथील स्वयंभू शिवमंदिरामधील अनेक वर्षांपासून नवसपूर्तीनंतर बांधण्यात आलेल्या असंख्य लहानमोठ्या आकाराच्या घंटांची आणि पिंडीवरील आभूषण यांची चोरी झाल्याचे समजले. यानंतर या चोरीसंदर्भात स्थानिक ग्रामस्थाकडून पोलादपूर पोलीसांना माहिती देण्यात आली. मात्र, यासंदर्भात कोणतीही कार्यवाही न झाल्याने मुंबईस्थित ग्रामस्थ आणि स्थानिक ग्रामस्थांनी पोलादपूर येथे येऊन पोलादपूर पोलीस ठाणे आणि पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांना लेखी तक्रार अर्ज देऊन चोरी करणाऱ्याला ताब्यात घेऊन मंदिरातील ऐवज पुन्हा मंदिरात जमा करण्याची विनंती केली. अनेक वर्षांपासून नवसपूर्तीनंतर बांधण्यात आलेल्या असंख्य लहानमोठ्या आकाराच्या घंटा पुन्हा मंदिरामध्ये पोहोचतील, यासंदर्भात प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा शिवभक्तांसह महादेवाचा मुरा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
शिवमंदिरामुळे महादेवाचा मुरा लोकवस्तीला पर्यटनाचा क दर्जा प्राप्त झाला त्या शिवमंदिरातील पिंडीवरील आभूषणे आणि असंख्य लहानमोठ्या आकाराच्या घंटा पुढील पर्यटन विकासापूर्वीच चोरीला गेल्याने या मंदिराचे जाज्वल्य महत्त्व कमी करण्याच्या हेतूने हा प्रकार झाला अशी शक्यता व्यक्त होत आहे.