हवामान खात्याचा 'यलो अलर्ट' खरा ठरला; पुढील ६ ते ७ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई/ठाणे: पाऊस परत आला! हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरवत आज (गुरुवारी) सायंकाळच्या सुमारास मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारात दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची आणि विक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली.
हवामान खात्याचा 'यलो अलर्ट' ठरला खरा
हवामान खात्याने आज राज्यातील १३ जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट दिला होता. त्यानुसार ठाण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला, ज्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली होती. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर यांसारख्या उपनगरांमध्ये सायंकाळी अचानक कोसळलेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी, जनजीवनावर मोठा परिणाम झाला.
दिवाळी खरेदीला फटका
दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर असल्याने बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होती. अचानक पाऊस सुरू झाल्याने फटाक्यांची आणि दिवाळी साहित्याची दुकाने थाटलेल्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बदलापूरमध्ये अनेक व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने विजेचे खांब कोसळल्याच्या घटना घडल्या.
ग्रामीण भागात शेतात कापून ठेवलेले भात भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाची अचानक आलेल्या पावसामुळे मोठी धावपळ उडाली. कल्याण-डोंबिवलीच्या काही भागांमध्ये बत्तीगुल झाली होती.
पुढील ६-७ दिवसांसाठी इशारा
हवामान खात्याने पुढील ६ ते ७ दिवसांमध्ये महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, असा इशारा दिला आहे. मुंबई आणि ठाण्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण राहून अधूनमधून सौम्य पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.