
मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव गोकुळधाम येथील भागांमध्ये मागील काही दिवसांपासून कमी दाबाने होणाऱ्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे गोकुळधामसह आसपासच्या अनेक छोट्या आणि मोठ्या इमारतींसह सोसायट्यांमध्ये या तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे येथील इमारती आणि टॉवरना टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या या समस्येबाबत स्थानिक माजी नगरसेविका प्रीती सातम यांनी थेट जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे यांची भेट घेतल्यानंतर पी दक्षिण विभागातील जल खात्यातील अधिकाऱ्यांची आता एकच धावपळ सुरु झाली आहे.
गोरेगाव पूर्व मधील गोकुळधाम परिसरासह एम एस एस सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, ऑबेरॉय वूड्स, डिबी वूड्स, लक्षचंडी, अमृतवन, बंगाली कंपाऊंड, नवभारत तसेच दूधसागर आदी सोसायटींमध्ये मागील काही दिवसांपासून कमी पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिक अपुऱ्या पाण्याअभावी त्रस्त आहेत. याबाबत नागरिकांनी स्थानिक माजी भाजपा नगरसेविका प्रीती सातम यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर त्यांनी तातडीने जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर जलअभियंता यांनी पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त जलकामे यांना निर्देश दिल्यानंतर विभागातील अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे.
विभागातील अनेक छोट्या आणि मोठ्या सोसायट्यांमधून पाणी समस्येच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर याचा शोध घेण्यास सुरुवात केली. प्रथम गळतीमुळे हा प्रकार सुरु असेल असे वाटले होते, पण अधिक शोध घेतला असता मालाड जलाशयातून जिथे पूर्वी १० पाऊंडच्या दाबाने पुरवठा व्हायचा तो आता ०७पाऊंडने केला जात असल्याचे समजले. त्यामुळे मालाड जलाशयातील पाण्याची पातळी समपातळीत नसल्याने या भागात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नव्हता. त्यामुळे ही बाब जलअभियंता यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी विभागातील अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशानुसार आता प्रत्यक्षात पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही सुरु केली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी पाणी पुरवठा सुरळीत होईल असा विश्वास आहे. - प्रीती सातम, भाजपा,माजी नगरसेविका