मलेशिया : पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी धर्म विचारुन पर्यटकांची हत्या केली. यानंतर आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत तीन वेळा भारत आणि पाकिस्तानचे पुरुष क्रिकेट संघ तसेच आयसीसी महिला विश्वचषकात एकदा भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले. या चार वेळा खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन करणे टाळले. यामुळे मलेशियात सुलतान जोहर कप हॉकी स्पर्धेत भारत पाकिस्तानचे खेळाडू काय करणार याविषयी अनेकांना उत्सुकता होती. हॉकीपटूंनी त्यांच्या पातळीवर हा प्रश्न अनोख्या पद्धतीने सोडवला.
भारत पाकिस्तानच्या ज्युनिअर हॉकीपटूंनी एकमेकांना हस्तांदोलन करण्याऐवजी हाय फाय केले, अर्थात दुरुन हात दाखवत अभिवादन केले. यानंतर हॉकीचा सामना सुरू झाला. दोन्ही संघांच्या व्यवस्थापनाने एकमेकांच्या खेळाडूंना सध्याच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज दिला होता तसेच हस्तांदोलन झाले नाही तरी एकमेकांविषयी राग बाळगण्याऐवजी खेळात उत्तम कामगिरी करण्याचा सल्ला दिला होता. खेळाडूंनी हुशारी केली. हाय फाय करत आधुनिक पद्धतीने अभिवादन केले.
याआधी ऑगस्ट महिन्यात बिहारमधील राजगीर येथे पुरुष आशिया चषक हॉकी स्पर्धा झाली. या स्पर्धेवेळी पाकिस्तानने भारतात त्यांचा हॉकी संघ पाठवणे टाळले होते. भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवरील बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची तयारी दाखवली पण संपूर्ण स्पर्धेत एकमेकांचा पराभव करण्यासाठी चांगली कामगिरी करण्यावर भर दिला.