मुंबई : सध्याच्या बदलत्या हवामानामुळे अनेकांना वारंवार सर्दी, खोकला, अंग दुखणे आणि ताप याचा त्रास होतो. पावसाळा, हिवाळा आणि अगदी उन्हाळ्यात सुद्धा वातावरणातील बदलांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि आजार पटकन जडतो. विशेषतः वारंवार येणाऱ्या तापामुळे शरीर थकते, कामात अडथळा येतो आणि औषधांवर अवलंबित्व वाढतं.
यावर बहुतांश लोक तात्पुरता उपाय म्हणून तापाच्या गोळ्या, अँटीबायोटिक्स किंवा इतर औषधांचा वापर करतात. मात्र ही औषधं वारंवार घेतली तर त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. काही लोकांना या औषधांचा प्रभाव तात्पुरता वाटतो, आणि ताप परत परत येत राहतो. अशावेळी आयुर्वेदात दिलेले नैसर्गिक उपाय अधिक प्रभावी आणि आरोग्यदायी ठरू शकतात.
गोकर्ण (Aparajita) – एक उपयुक्त औषधी वनस्पती
आयुर्वेदात गोकर्ण, ज्याला अपराजिता असंही म्हटलं जातं, ही एक अत्यंत उपयुक्त आणि बहुगुणी औषधी वनस्पती मानली जाते. निळ्या किंवा पांढऱ्या फुलांची ही वेल स्वरूपात आढळणारी वनस्पती विविध आजारांवर फायदेशीर मानली जाते.
गोकर्णच्या मुळांचा काढा तयार करून घेतल्यास वारंवार येणाऱ्या तापावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. हा काढा शरीरातील उष्णता नियंत्रित करतो, प्रतिकारशक्ती वाढवतो आणि ताप पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता कमी करतो.
गोकर्णचे इतर आरोग्यदायी फायदे
१. मासिक पाळीतील त्रास:
हा रस घेतल्यास मासिक पाळीतील अस्वस्थता कमी होते आणि हार्मोनल संतुलन सुधारते.
२. बुद्धी आणि एकाग्रता वाढवते:
गोकर्णाच्या फुलांपासून तयार केलेले पाणी किंवा चहा मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी लाभदायक मानला जातो. विद्यार्थ्यांसाठी आणि सतत मानसिक काम करणाऱ्यांसाठी हे एक नैसर्गिक टॉनिक आहे. हे पाणी रोज घेतल्यास स्मरणशक्ती आणि एकाग्रतेत सुधारणा होते.
३. संधीवात आणि सांधेदुखी:
गोकर्णाचा काढा संधिवात, सांधेदुखी, आणि जॉईंट पेनमध्ये अत्यंत उपयोगी ठरतो. शरीरातील सूज कमी करतो आणि सांध्यांना लवचिकता प्रदान करतो.
४. दृष्टी सुधारते:
ज्यांना दृष्टिदोष किंवा नजर कमजोर होत असल्याचा अनुभव येतो, अशांसाठी गोकर्णाचा काढा उपयुक्त ठरतो. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हा एक उत्तम आयुर्वेदिक उपाय मानला जातो.
गोकर्ण काढा तयार करण्याची पद्धत:
साहित्य:
गोकर्णचे मुळे (कोरडी किंवा ताजी) आणि २ कप पाणी
कृती:
एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. त्यात गोकर्णची मुळे टाका. १०–१५ मिनिटे मंद आचेवर उकळा. अर्धे पाणी राहिलं की गाळून घ्या. काढा थोडासा कोमट असताना सेवन करा.
हे दररोज सकाळी आणि संध्याकाळी घेतल्यास शरीरातील उष्णता नियंत्रणात राहते आणि वारंवार होणाऱ्या तापाची तीव्रता कमी होते.
सूचना आणि काळजी:
कोणत्याही आयुर्वेदिक उपायाची सुरूवात वैद्यकीय सल्ल्याने करावी.
गोकर्ण वनस्पती नैसर्गिक असूनही, प्रत्येकाची शारीरिक प्रकृती वेगळी असते. त्यामुळे काहींना त्रास होऊ शकतो.
गर्भवती महिलांनी, स्तनपान करणाऱ्या मातांनी किंवा गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी गोकर्णचा काढा घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सतत गोळ्या आणि औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा, आयुर्वेदात सांगितलेले सोपे आणि नैसर्गिक उपाय वापरणे शरीरासाठी अधिक लाभदायक ठरते. गोकर्णसारख्या औषधी वनस्पतींचा समावेश आपल्या दैनंदिन आरोग्यात केल्यास रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि वारंवार होणाऱ्या तापासारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.