उदय पिंगळे
बचत : भविष्यातील आपल्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी उत्पन्नातील काही भाग बाजूला ठेवणे म्हणजे बचत होय. आपल्या उत्पन्नातून खर्च वजा करता राहिलेली शिल्लक म्हणजे बचत असे म्हणता येईल. तिची मांडणी खालील सूत्रात करता येईल. बचत : उत्पन्न-खर्च
आपले आर्थिक भवितव्य सुनिश्चित करण्यासाठी, दीर्घकालीन इच्छांची पूर्तता करण्यासाठी, आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी बचतीचा उपयोग होतो.
बचत का करावी?
बचतीची सुरुवात आपण जितक्या लवकरात लवकर करू ते अधिक चांगलं. बचतीचे महत्त्व अधोरेखित करणारे काही मुद्दे असे आहेत, की
●बचतीमुळे आपल्याकडे राखीव निधी (गंगाजळी) तयार होतो. त्यातून काही आकस्मित खर्च जसे की आजारावरील उपचार, व्यवसायातील तोटा यांची भरपाई करू शकतो. आपली आर्थिक उद्दिष्टे जसे की घर, मुलांचे उच्च शिक्षण आपल्या निवृत्तीचे आर्थिक नियोजन करू शकतो. म्हणूनच, आज आत्तापासूनच बचतीची सवय लावून घेऊन आर्थिक स्वावलंबन आणि आत्मसमाधानाच्या दिशेने पहिले पाऊल पुढे टाकू या.
२. आपल्या खर्चाचे प्राधान्यक्रम ठरवून अधिकाधिक बचत करण्यासाठी गरजा, इच्छा आणि आकांक्षा यातील फरक जाणून घेणं गरजेचं आहे.
★गरजा- आपल्याला सर्वसाधारण जीवनमान जगण्यासाठी किमान आवश्यक असलेल्या गरजा, उदा अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, शिक्षण, आरोग्य सुविधा यावरील खर्च.
इच्छा - या जगण्यासाठी आवश्यक नसल्या तरी त्यामुळे आपले जीवन समृद्ध होते. उदा. मनोरंजन, हॉटेलिंग, पर्यटन.
★आकांक्षा - ज्यामुळे आपल्याला आपली स्वप्नपूर्ती झाली असे वाटते अशा तीव्र इच्छा म्हणजे आकांक्षा. महागडी गाडी, बाजारात येणाऱ्या नवनव्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, महागडे मोबाईल इत्यादी. ज्या मिळायला हव्यात म्हणून तुम्हाला कदाचित कर्ज घेण्याचा मोह होतो. आपल्या प्राथमिक गरजांकडे दुर्लक्ष करून इच्छा आकांक्षाची पूर्तता कराल तर बचत करणे अशक्य आहे. म्हणूनच बचतीकडे दुर्लक्ष न करता आधी प्राथमिक गरजा नंतर इच्छा आणि त्यानंतर आकांक्षा असा खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवावा. यातील क्रमात कोणताही अदलाबदल झाल्यास आर्थिक स्थैर्य निर्माण होणार नाही.
३. उत्पन्न आणि खर्चाचे व्यवस्थापन: प्रत्येकाने आपल्या खर्चाचा मागोवा घेऊन त्याचा आढावा घेण्यासाठी आपले उत्पन्न आणि खर्चाचे नियोजन करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करणे जरुरीचे आहे.
उत्पन्न आणि खर्च यांचे व्यवस्थापन करण्याचे मार्ग :
●अंदाजपत्रक तयार करणे : अंदाजपत्रक तयार करण्यासाठी आपल्याला मिळणारे सर्व उत्पन्न जसे पगार, बोनस, घरभाडे, व्यवसायाचे उत्पन्न, अन्य उत्पन्न आणि अपेक्षित खर्च जसे वाणसामान, वीज बिल, अन्य बिले, मनोरंजन यांच्यावरील अपेक्षित खर्च लिहून काढा. हे खर्च करत असताना उत्पन्नातील काही भाग हा बचत आणि गुंतवणूक यासाठी राखून ठेवा आणि त्यानंतर या अंदाजपत्रकाचे तंतोतंत पालन करा.
●खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवा: खर्च करताना गरजेच्या गोष्टी सर्वप्रथम त्यानंतर इच्छा आणि आकांक्षा असा क्रम असू द्या. तरीही काही शिल्लख राहत असेल तर आणि तरच अनावश्यक खर्चाचा विचार करा.
राखीव निधी निर्माण करा : उत्पन्नातील काही रक्कम सक्तीने बाजूला ठेवून गंगाजळी निर्माण करा. अकस्मात येणारे संकट आणि त्यामुळे उद्भवणारे खर्च यांच्याशी सामना करण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
●गुंतवणूक करा : आपल्या इच्छा, आकांक्षा लवकरात लवकर आपल्या उत्पन्नातील काही भागाची गुंतवणूक करा.
४. महागाई: वस्तू आणि सेवा यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असते. त्यामुळे पैशांचे मूल्य कमी होते म्हणजे आज जी वस्तू ₹१००/- मध्ये येईल त्यापेक्षा कमी प्रमाणात भविष्यात वस्तू उपलब्ध होते. महागाई दरवर्षी ६% दराने वाढत असेल तर आज शंभर रुपयात उपलब्ध असलेल्या वस्तू अथवा सेवेसाठी आपल्याला पुढील वर्षी ₹ १०६/- मोजावे लागतील. महागाईचा दर ६% असल्यास सध्याचे ₹ १ लाखचे मूल्य ५ वर्षांनी ₹ ७४७००/-, १० वर्षांनी ₹ ५५८००/-, १५ वर्षांनी ₹ ४१७००/- ,तर २० वर्षांनी ₹ ३१२००/- असे कमी कमी होईल. महागाई नियंत्रणात आणणे आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्यातील नाही. त्याचे आपल्या वैयक्तिक अर्थकारणावर होणारे विपरीत परिणाम कमी करता येतात. त्यासाठी,
●खर्चांचा प्राधान्यक्रम ठरवा आणि अनावश्यक खर्च टाळा.
●आपली गुंतवणूक विविध मालमत्ता प्रकारात अशी विभागा की त्यातून मिळणारा सरासरी परतावा हा महागाईवर मात करणारा असेल
● शेअर्स, म्युच्युअल फंड, सोने यातील गुंतवणुकीवर यांनी दिलेल्या परताव्याचा इतिहास पाहिला असता त्यातून दीर्घकाळात महागाईवर निश्चितच मात करता येते.
५. चक्रवाढ गतीने होणारी तुमच्या पैशांची वाढ : जसजसा अधिक काळ जाईल तसतशी चक्रवाढ व्याजाने तुमच्या बचतीतील केवळ मुद्दल नव्हे तर त्यावर मिळणाऱ्या व्याजावरील व्याजाने मोठ्या प्रमाणात वाढ होते. अल्बर्ट आईस्टाईन म्हणतात, चक्रवाढ व्याज हे जगातील आठवं आश्चर्य आहे. हे ज्याला समजतं तो कमावतो आणि ज्याला ते समजत नाही तो त्याची किंमत मोजतो.
●चक्रवाढ व्याजाची जादू: जर १ लाख रुपये १०% सरळ व्याजाने २० वर्षांसाठी ठेवले तर त्याचे तीन लाख रुपये होतात पण हीच रक्कम १०% चक्रवाढ व्याजाने ठेवली असता २० वर्षांनी ६ लाख ७२ हजार होतात. तुम्ही हे पडताळून पाहू शकता. झटपट चक्रवाढ व्याजाची मोजणी करण्यासाठी ७२ चा नियम- व्याजदराने ७२ या संख्येस भागले असता गुंतवणूक दुप्पट होण्याचा कालावधी समजेल. उदा. चक्रवाढ व्याजदर ९% असेल तर गुंतवणूक दुप्पट होण्यास ७२÷९= ८ म्हणून ८ वर्ष लागतील.
★ नियम ११४ नुसार मुद्दल तिप्पट होण्याचा तर नियम १४४ नुसार मुद्दल चौपट होण्याचा कालावधी समजतो.