को जागर्ति... कोण जागे आहे?

संवाद: गुरुनाथ तेंडुलकर


पंधरा दिवसांपूर्वी माझ्या एका गृपमधल्या मित्राचा फोन आला. ‘तेंडल्या, पुढच्या सोमवारी संध्याकाळी फ्री राहा. आपल्याला नाईटआऊटला जायचंय. आपला अख्खा ग्रुप तयार झालाय. तू नाही म्हणू नकोस. मागच्या वेळेला तू ऐन वेळेला टांग दिली होतीस.’


‘ठीक आहे. बघतो.’ मी गुळमुळीत उत्तर दिलं आणि पुढे विचारलं, ‘पण सोमवारी नाईटआऊट कशाबद्दल रे? का रे काही खास?’


‘अरे सोमवारी कोजागिरी आहे. रात्र जागवूया.’

‘हो. पण कोजागिरीला रात्री फक्त मसाले दूध प्यायचं असतं ठाऊक आहे ना?’ मी थोडा मिश्किल आणि खोचक प्रश्न विचारला. आमच्या या ग्रुपमधले अनेक सदस्य तर दररोज संध्याकाळनंतर....

‘ठीक आहे रे. ज्यांना दूध प्यायचं ते दूध पितील आणि इतरांना जे जे हवं ते ते पिऊ दे की. शेवटी काय तर आयुष्यात एन्जॉयमेंट महत्त्वाची. कोजागिरी हे फक्त एक निमित्त आहे रे.’ तो मित्र पुढेही बरंच काही बोलत राहिला.

मी ‘हूं ... हूं...’ करीत सगळं ऐकून घेतलं. अलीकडे मी कुणाशीही वाद घालत नाही. ‘कुणाशी वाद घालून काहीच उपयोग होत नाही.’ हे मी आयुष्यातल्या अनेक अनुभवातून शिकलोय. फोनवरचं आमचं बोलणं आटोपलं आणि मी इतर कामाला लागलो तरीही त्या मित्राचे ते शब्द माझ्या कानात रुंजी घालत राहिले. ‘शेवटी काय तर आयुष्यात एन्जॉयमेंट महत्त्वाची. कोजागिरी हे फक्त एक निमित्त आहे रे.’

कोजागिरीचं निमित्त साधून रात्र जागवायची. धम्माल करायची. एवढंच...?

वास्तविक कोजागिरी पौर्णिमा हा आपल्या सनातन भारतीय संस्कृतीमधला एक अविभाज्य सण आहे. या सणामागे काही कथा-कहाण्या जोडलेल्या आहेत. त्यातील एक कहाणी म्हणजे... समुद्रमंथनातून जी चौदा रत्नं निघाली त्यापैकी एक रत्न म्हणजे श्रीदेवी लक्ष्मी. ती भूतलावर प्रकट झाली तो दिवस म्हणजे अश्विन पौर्णिमा. म्हणूनच या दिवसाला ‘महालक्ष्मीचा जन्मदिवस’ म्हणून मान्यता आहे.

अद्यापही कृषीप्रधान असलेल्या आपल्या भारत देशात ग्रामीण भागात हा दिवस ‘नवान्न पौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. शेतात नवीन पिकवलेल्या धान्याची पूजा करून त्याची विविध पक्वान्नं बनवतात. विविध प्रकारच्या भाज्या आणि विविध प्रकारची पक्वान्नं बनवून लक्ष्मीनारायणाला नैवेद्य दाखवला जातो. गुजरात, राजस्थानमध्ये या सणाला ‘शरद पूनम’ असं म्हणतात. त्यादिवशी राधाकृष्णाची पूजा करून रास-गरबा खेळला जातो. हिमाचल प्रदेशात तर या दिवशी ठिकठिकाणी जत्रा भरतात.ओडिसामध्ये या पौर्णिमेला ‘कुमार पौर्णिमा’ असेही म्हणतात. त्यादिवशी हत्तीवर बसलेल्या गजलक्ष्मी देवीची पूजा करतात. तसंच प्रकाशाचं प्रतीक म्हणून दिवसा सूर्य आणि रात्री चंद्राचीही पूजा केली जाते. बंगालमध्ये कोजागिरीला बंगाली लोक ‘लोख्खी पूजो’ म्हणतात आणि संपूर्ण विश्वाचं पालन करणाऱ्या लक्ष्मीनारायणाची उपासना करतात.

विविध प्रांतात विविधप्रकारे साजरी होणारी ही शरद पौर्णिमा... पण या सर्व प्रांतातील एक समजूत मात्र समान आहे आणि ती म्हणजे...मध्यरात्री श्री लक्ष्मीमाता घरोघरी जाऊन दारातून विचारते.

‘को जागर्ति? कोण जागं आहे?’

ज्या घरात लोक जागे असतात त्या घरात ती प्रवेश करते आणि त्या घरात नांदते. घरात श्रीलक्ष्मी नांदल्यामुळे साहजिकच कुटुंबाची भरभराट होते. म्हणून कोजागिरीच्या रात्री जाग्रण करण्याची पद्धत आणि परंपरा निर्माण झाली. माता लक्ष्मी घरोघरी जाऊन दारात उभी राहून विचारते. ‘को जागर्ति? कोण जागं आहे?’


‘कोण जागं आहे? या प्रश्नामागचा अर्थ नीट समजून घ्यायचा असेल तर भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील एकोणसत्तराव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की...

या निशा सर्वभूतानां तस्या जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनैः।।

भावार्थ : भौतिक लाभाकरिता आणि केवळ स्वतःच्या मौजमजेकरता सर्वच जागृत असतात पण संयमी पुरुष मात्र अशावेळी झोपलेला असतो. इथे झोपलेला असतो म्हणजे त्याला अशा प्रकारात फारशी रुची नसते; परंतु ज्या विषयी सर्वसामान्य माणसं झोपलेली असतात म्हणजेच जागरूक नसतात त्या विषयासंबंधी मुनी म्हणजेच ज्ञानी व्यक्ती सतत जागृत असतात.

लक्ष्मी माता विचारते ‘को जागर्ति? म्हणजे कोण जागं आहे?’ इथं जागं राहणं म्हणजे न झोपता राहणं असं नसून स्वतःच्या उत्कर्षाच्या बाबतीत त्याचबरोबर समाजाच्या अभ्यदयासाठी जागृत कोण आहे? असं ती विचारते.

ज्या घरातील लोक खऱ्या अर्थाने जागृत असतात, त्याच घराची भरभराट होते. इथं आणखी एक श्लोक आठवला.... आमच्या लहानपणी घरोघरी दिवेलागणीच्या, म्हणजेच संध्याकाळच्या वेळी देवासमोर दिवा लावून शुभंकरोति... म्हणण्याची प्रथा होती.

शुभं करोति कल्याणम् आरोग्यम धनसंपदा ।
शत्रु बुद्धि विनाशाय दीपज्योती नमोस्तुते ।।

हे प्रकाशाची देवता असणाऱ्या दिव्या, तुला आम्ही नमस्कार करतो. आमचं शुभ कर. कल्याण कर. आम्हाला आरोग्य आणि धनसंपदा लाभू दे. आमच्यातील शत्रूत्वाच्या बुद्धीचा म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहाही शत्रूंचा विनाश होऊ दे.....

संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला घराघरांतून स्त्रोत्रं म्हटली जायची. परवचा-पाढे म्हटले जायचे. पण आता...आता संध्याकाळच्या वेळेला तिन्हीसांज म्हटली जात नाही. तो असतो प्राईम टाईम. या प्राईम टाईममध्ये घराघरांतून ज्या हिंदी आणि मराठी मालिका निरनिराळ्या चॅनलवरून सुरू असतात त्यांचा लसावी म्हणजेच लघुत्तम साधारण विभाजक काढला तर काय दिसतं...?

केवळ आणि केवळ शत्रूबुद्धी..... सासू विरुद्ध सून, थोरल्या सुनेच्या विरोधात धाकटी सून.... नणंद-भावजयीतील गृहकलह. एकमेकांवर केल्या जाणाऱ्या कुरघोड्या, कागाळ्या आणि कारस्थानं..... ऑफिसमध्ये सुरू असणाऱ्या स्पर्धा, जिंकण्यासाठी एकमेकांच्या विरोधात उघडलेले मोर्चे.... पैशांची अफरातफर.... गरीब घरातील सगळ्याच मुली बिचाऱ्या चांगल्या आणि श्रीमंत घरातील बायका मुलींपैकी बहुतेक जण हे अहंकारी आणि हलकट वृत्तीचे. नायक-नायिकेच्या विरोधात रचले जाणारे कट. त्यांना दिला जाणारा शारीरिक आणि मानसिक त्रास. नायक-नायिकांमध्ये वितुष्ट निर्माण करण्यासाठी योजलेले प्रसंग आणि हे सगळं झगझगीत दाखवण्यासाठी घरातलं वातावरण..... सध्या तिन्हिसांजेच्या वेळेला म्हणजेच टीव्हीवाल्यांच्या दृष्टीनं ज्याला प्राईम टाईम म्हणतात त्यावेळी दाखवल्या जाणाऱ्या सिरिअल तुम्ही स्वतःच तपासून पहा. प्रेक्षकांमधली सात्विक वृत्ती संपवून परस्परांतील शत्रुबुद्धी वाढवण्यासाठी जणू विडाच उचललाय की काय असं वाटतं.

आजही तिन्हीसांजेच्या वेळेला श्रीमहालक्ष्मी प्रत्येकाच्या घराच्या दरवाजाशी थांबते. आत काय चाललंय याचा कानोसा घेते. डोकावून पहाते. तिला आतून जे आवाज ऐकू येतात.... टीव्हीवर जी दृष्यं दिसतात ते पाहून तिला आत येणाचा धीर होईल का?

आतमधले लोक विशेषतः गृहलष्म्या टीव्हीवरच्या वर्षानुवर्षं चालणाऱ्या चटकदार आणि कौटुंबिक कलहाच्या मालिका पहाण्यात दंग असतात. तरुण-तरुणी रात्रीच्या वेळी जाग्रणं करून ओटीटीवर अनेक वेबसिरिज बघतात. त्याशिवाय फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर छोटे छोटे रील्स बघतात.... त्याशिवाय टीव्हीवर चालणाऱ्या क्रिकेटच्या बारमाही मॅचेस आहेतच.... हे सगळं पाहाताना तास न तास कसे निघून गेले हे कळतही नाही की जाणवतही नाही. या वेळात होऊ शकणारी महत्वाची कामं देखील राहून जातात. टीव्ही आणि मोबाईलपासून दूर राहून तेवढय़ा वेळात स्वतःच्या आरोग्यासाठी व्यायाम, योगासनं केली तर....?

ज्या घरात सुख-शांती समृद्धी आरोग्य आणि ऐश्वर्य नांदावसं वाटत असेल तर त्या घरातील प्रत्येकाने स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या उत्कर्षासंबंधी जागृत रहायला हवं. लेखाची सांगता करताना स्वामी विवेकानंदांनी तमाम भारतवासियांना कठोपनिषदातील दिलेला संदेश सांगतो. स्वामीजी म्हणत...

`उत्तिष्ठत.... जाग्रत.... प्राप्य वरन्निबोधत....’

भावार्थ : उठा. जागे व्हा. ज्ञानी व्यक्तींच्या संगतीत राहून आत्मोन्नतीचं ज्ञान प्राप्त करून घ्या.
Comments
Add Comment

समाजमाध्यमांच्या आहारी...

दखल : मंजिरी ढेरे अलीकडच्या काही महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी मुलांच्या ‌‘सोशल मीडिया‌’ वापरावर

जादू जेवर विमानतळाची

पैलू : अजय तिवारी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा एव्हिएशन क्षेत्रातील ‌‘आर्थिक गळती‌’ थांबवण्याचा लक्षवेधी

गावची जत्रा - आठवणींचा दरवळ

स्मृतीगंध : लता गुठे वेळ दुपारची, एसी गाडीतही जाणवणारं रणरणतं ऊन, डांबरी सडकेवर खेळणारं मृगजळ आणि रस्त्याच्या

‘उठो, हमारा सलाम ले लो’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ‘मुगले आझम’(१९६०)मध्ये दिलीपकुमार (सलीम उर्फ जहांगीर) आणि मधुबाला (अनारकली)

आम्ही चालवू हा पुढे वारसा...

स्पंदन : अश्विनी शिंदे - भोईर गावाचं गावपण राखून असलेलं बोर्डी हे डहाणू तालुक्यातील निसर्गरम्य गाव. भारत

ब्रह्मचर्य व गृहस्थ धर्म

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे भारतीय परंपरेत मानवी जीवन चार आश्रमात विभागले आहे. ब्रह्मचर्याश्रम,