मुंबई: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५मध्ये आज १३व्या सामन्यात भारतीय महिला संघाची लढत ऑस्ट्रेलियासोबत होत आहे. दोन्ही संघादरम्यानचा हा रोमांचक सामना विशाखापट्टणमच्या क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. सामन्यादरम्यान दोन्ही संघांचा प्रयत्न असेल की ते हा सामना जिंकत पॉंईंट्स टेबलमध्ये आपली स्थिती मजबूत करतील. याचमुळे आजचा हा सामना रोमहर्षक होणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघादरम्यान आतापर्यंत वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत ५९ सामने खेळवण्यात आलेत. या दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाचे पारडे जड राहिले आहे. कांगारूच्या संघाने ४८ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर भारताच्या महिला संघाला केवळ ११ सामन्यांमध्ये यश मिळाले आहे.
इतकंच नव्हे तर सध्याच्या सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्येही ऑस्ट्रेलिया संघ आघाडीवर आहे. दोन्ही संघांनी अनुक्रमे तीन तीन सामने खेळले आहेत. यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाला दोन सामन्यात विजय मिळाला तर एक सामना अनिर्णीत राहिला. तर भारतीय महिला संघाला दोन सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभव पत्करावा लागला.
ऑस्ट्रेलियाचा महिला संघ पाच गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या तर भारतीय महिला संघ चार गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ आहे. त्यांचे सर्वाधिक ६ गुण आहेत.
दोन्ही संघाचे संभाव्य प्लेईंग इलेव्हन
भारतीय महिला संघ - प्रतिका रावल, स्मृती मंधाना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर(कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, अमनजोत कौर, स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी/ रेणुका सिंह ठाकूर.
ऑस्ट्रेलिया महिला संघ- एलिसा हीली(कर्णधार), फोबे लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, एनाबेल सदरलँड, एशले गार्डनर, ताहलिया मॅकग्राथ, जॉर्जिया वेयरहम, सोफी मोलिनिक्स, किम गर्थ, अलाना किंग, मेहन स्कूट