उबाठा म्हणतात, बेस्ट कामगार सेनेचं काय होईल याची चिंता नाही; मग भ्रष्टाचारात बुडालेल्या बेस्ट कामगार सेनेला सचिन अहिर कसे तारणार?
बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदी सचिन अहिर यांची नियुक्ती केल्याने उबाठा गटात नाराजी
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी बेस्ट कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलेले विधान सध्या राजकीय वर्तुळात आणि कामगार नेत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. "बेस्ट कामगार सेनेचं काय होईल याची मला चिंता नाही, पण बेस्टचं काय होईल याची काळजी आहे," या ठाकरे यांच्या वक्तव्याने उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
बेस्ट कामगार सेनेची पदाधिकारी बैठक शिवसेना भवन येथे शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना चक्क बेस्ट कामगार सेनेचं काय होईल याची चिंता नाही, असे म्हटल्याने उपस्थितांनी कपाळावर हात मारत आश्चर्य व्यक्त केले. शिवसेनेत उभी फूट पडली त्यावेळी देखिल उद्धव ठाकरेंनी असेच ज्यांना जायचं त्यांनी जावं मला काही फरक पडत नाही असे म्हटले आणि मग ते अक्षरश: तोंडावर आपटले. तरीही ठाकरे यांची गुर्मी आजही कायम असल्याचे टीकाकार म्हणत आहेत.
नवनियुक्त अध्यक्ष सचिन अहिर, सरचिटणीस नितीन नांदगावकर यांचे ठाकरेंनी अभिनंदन केले. यावेळी उपस्थित असलेल्या उबाठा गटाचे नेते आमदार सुनिल प्रभू, उपनेते बेस्ट कामगार सेनेचे मार्गदर्शक गौरीशंकर खोत, सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, माजी महापौर स्नेहल आंबेकर यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते.
नाराजी आणि नवी जबाबदारी
बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्षपद सचिन अहिर यांच्याकडे सोपवल्यामुळे जुन्या आणि अनुभवी कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना पसरली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही निष्ठा टिकवून असलेल्या या पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षांवर हे निर्णय पाणी फेरून गेले आहेत. अहिर यांच्यासोबत सरचिटणीसपदी नितीन नांदगावकर यांची नियुक्ती झाली आहे.
भ्रष्टाचार आणि पराभवाची आठवण
ठाकरे यांच्या विधानानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांना बेस्ट पतपेढीत झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराची आठवण झाली. याच भ्रष्टाचारामुळे बेस्ट कामगार सेनेला नुकत्याच झालेल्या पतपेढी निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनलने २१ पैकी १४ जागा जिंकत बेस्ट कामगार सेनेचे वर्चस्व संपुष्टात आणले होते.
त्यामुळे बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदी सचिन अहिर यांची नियुक्ती झाली असली तरी, भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतलेल्या या सेनेला अहिर कसे तारणार, हा प्रश्न उरलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण करत आहे.
ठाकरे गटाचे विधान किती पोकळ आहे, हे बेस्ट पतपेढीचा निकाल दाखवतो. पतपेढीत झालेल्या भ्रष्टाचारामुळे संतप्त कामगारांनी बेस्ट कामगार सेनेला पूर्णपणे नाकारले. कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनलने २१ पैकी १४ जागा जिंकत भ्रष्टाचाराचा मुद्दा ठळकपणे मांडला.
शशांक राव यांनी स्पष्ट केले की, ठाकरे गट सत्तेत असताना ग्रॅच्युइटीचे पैसे ठेकेदारांना काढून दिले, ज्यामुळे आज सेवानिवृत्त कामगारांना त्यांचे हक्काचे पैसे देण्यासाठीही बेस्टकडे निधी नाही. "बेस्ट पतपेढीतील मागील नऊ वर्षांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येईल," असा इशाराही राव यांनी दिला.
त्यावेळी शशांक राव यांनी आरोप करताना म्हटले की, शिवसेनेने त्यांच्या सत्ताकाळात बेस्ट उपक्रमात खाजगीकरण आणले. तसेच, बेस्टमध्ये कामगारविरोधी धोरणे राबवली. मात्र बेस्ट पतपेढीत जो काही भ्रष्टाचार झाला त्यातून कर्मचाऱ्यांची चीड या निकालातून दिसून आली आहे. त्यामुळेच बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. परंतु आता आमचे पॅनल बेस्टच्या पतपेढीवर निवडून आले आहे. त्यामुळे आमचे पहिले टार्गेट बेस्ट पुन्हा पूर्वीप्रमाणे कशी चालेल याकडे लक्ष असेल. सामंजस्य करार केल्या प्रमाणे उपक्रमात ३३३७ बसेस ताफ्यात कशा लवकरात लवकर आणता येतील, ते पाहणार आहोत. तसेच २०२२ पासून बेस्टमधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांची देणी देणे बाकी आहे. ती त्यांना लवकर कशी देता येतील, तसेच बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प पालिका अर्थसंकल्पात कसा लवकर विलीन करता येईल, हे आम्ही पाहणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
शशांक राव म्हणाले की, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी तत्काळ त्यांना मिळायला हवी. ती बेस्टकडेच जमा असते. मात्र बेस्ट व पालिकेतही सत्तेवर असलेल्या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने ती ठेकेदारांना काढून दिली. त्यामुळे आज बेस्टकडे सेवा निवृत्त कामगारांची हक्काची ग्रॅच्युइटी देण्यासाठी सुद्धा तेवढे पैसे नाही. तसेच मागील नऊ वर्षांपासून बेस्ट पतपेढीवर बेस्ट कामगार सेनेचे वर्चस्व होते. त्यामुळे त्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीही करण्यात येईल, असा इशारा देताना शशांक राव म्हणाले की, पतपेढीवर सहकार समृद्धी पॅनलचे ७ जण निवडून आले आहेत. आम्ही त्यांना सोबत घेऊन पतपेढीचे कामगारांच्या हितासाठी व त्यांच्या पसंतीस उतरेल असे काम करू.
शशांक राव म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यावेळी पालिकेत त्यांची सत्ता होती. त्यानंतर २०१९ मध्ये ते मुख्यमंत्री झाले. पण अडीच वर्षात त्यांनी बेस्टचे प्रश्न काही सोडवले नाहीत. त्यामुळे आज बेस्ट व कर्मचाऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली आहे. त्यामुळे ते आम्हाला जवळचे वाटतात. तशी त्यांची मदत कामगार हितासाठी घेणे चूक नाही. कारण माझे पिताश्री कामगार नेते शरद राव हे सुद्धा शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. शरद पवारांची वेळोवेळी कामगारांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यात त्यांना (शरद राव) मदत झाली, अशी आठवणही शशांक राव यांनी सांगितली.
एकंदरीत, 'चिंता नाही' म्हणणाऱ्या नेतृत्वाला कामगारांनी मतपेटीतून स्पष्ट उत्तर दिले असून, आता नवीन नेतृत्व बेस्ट कामगार सेनेला पुन्हा उभे करणार की नाही, याकडे लक्ष लागले आहे.