ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महापालिकेचा अनागोंदी कारभार वारंवार उघड होत आहे. ठामपाच्या अतिक्रमण विभागातील १७० कर्मचाऱ्यांची अन्य विभागांमध्ये बदली करण्यास चालढकल केली जात आहे. या प्रकरणी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र देऊन या कर्मचाऱ्यांची बदलीची कारवाई करावी अशी मागणी केली आहे. २०२१ मध्ये बदलीचा आदेश दिल्यानंतरही महिनाभरात संबंधित कर्मचारी पुन्हा अतिक्रमण विभागातच दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विभागातील वर्षानुवर्षांच्या भ्रष्टाचाराची साखळी मोडून काढण्यासाठी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांवर बदलीच्या कडक कारवाईची आवश्यकता आहे.
ठामपाचा ४३ वा वर्धापन दिन १ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. याच दिवशी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना २५ लाखांची लाच घेताना पकडण्यात आले होते. त्यांनी ५० लाखांची मागणी केली होती. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी त्यांना २ ऑक्टोबरपासून सेवेतून निलंबित केले. त्यामुळे ठाण्याची बदनामी झाली. ठाणे म्हणजे विकास, आघाडीचे शहर या प्रतिमेला काळीमा फासला गेला. महापालिकांमध्ये ठाणे शहराचा नावलौकिक होत असतानाच, पाटोळेंमुळे शहराच्या प्रतिष्ठेला काळीमा फासला गेला, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल, असे नारायण पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
महापालिकेत अतिक्रमण विभागाप्रमाणेच शहर विकास, घनकचरा, सार्वजनिक बांधकाम विभागातील महत्वाच्या पदांवरही काही अधिकारी आणि कर्मचारी वर्षानुवर्षे कार्यरत आहेत. त्यांच्याही बदल्या लवकरात लवकर करण्याची गरज आहे, असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे. ठामपाच्या तत्कालीन आयुक्तांनी ८ ऑक्टोबर २०२१ रोजी पालिकेच्या अतिक्रमण विभागातील १७० कर्मचाऱ्यांची इतर विभागात बदली केली होती. मात्र, एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत त्या १७० कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत समाऊन घेण्यात आले. या प्रकाराची आपण चौकशी करावी.
तसेच सध्या ते १७० कर्मचारी कुठे काम करीत आहेत, याची आपण माहिती घ्यावी. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हितसंबंध निर्माण झाले असून, त्यामुळे शहरात अतिक्रमणे वाढत आहे. या कर्मचाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांची अन्य विभागात बदली करावी, अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे.






