मुंबई : आपली जीवनशैली जसजशी गतिमान होत आहे, तसतसे शरीर आणि मनावर ताण वाढत चालला आहे. दिवसभराची धावपळ, चुकीच्या आहाराच्या सवयी, झोपेची कमतरता आणि पाण्याचे अपुरे सेवन यामुळे शरीर थकलेले वाटू लागते. केवळ शारीरिकच नाही तर मानसिक थकवाही जाणवतो.
अशा वेळी घरच्या घरी काही सोपे आणि नैसर्गिक उपाय करून तुम्ही तुमचा थकवा दूर करू शकता आणि नवीन ऊर्जा मिळवू शकता. चला पाहूया हे उपाय:
१. कोमट पाणी किंवा नारळपाणी प्या
थकवा दूर करण्यासाठी शरीराला पुरेसे द्रव मिळणे अत्यंत आवश्यक असते. कोमट पाण्यात थोडं मध आणि लिंबू मिसळून प्यायल्यास ताजेतवाने वाटते. नारळपाणीही चांगला पर्याय आहे, कारण ते नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सने भरलेले असते.
२. हलका आणि पौष्टिक आहार घ्या
थोडीशी भूकही थकवा वाढवू शकते. अशावेळी केळी, सफरचंद, ड्रायफ्रूट्स, पीनट बटरसारखे स्नॅक्स घेतल्यास लगेच ऊर्जा मिळते. डार्क चॉकलेटदेखील झपाट्याने ऊर्जा पुरवतो.
३. तेल लावून हलके मालिश करा
स्नायूंमध्ये ताण असल्यास थकवा अधिक जाणवतो. अशावेळी गरम तेलाने, जसे की नारळ, ऑलिव्ह किंवा बदाम तेलाने मान, खांदे आणि पायांची हलकी मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीर हलकं वाटतं.
४. थोडा वेळ बाहेर फिरा
सतत बसून काम करत असाल तर थोडा वेळ बाहेर जाऊन फेरफटका मारा. १० मिनिटांचा चालण्याचा ब्रेक तुमचं मन आणि शरीर दोन्ही फ्रेश करू शकतो. चालण्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि थकवा कमी होतो.
५. हर्बल चहा पिणे
आलं, पुदिना किंवा ग्रीन टी सारखे हर्बल चहा तुमचं मन शांत करतील आणि शरीराला उर्जाही देतात. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर एक कप गरम हर्बल चहा तुमच्यात नवचैतन्य निर्माण करू शकतो.
६. स्ट्रेचिंग किंवा ध्यान करा
हलकं स्ट्रेचिंग, योगासने किंवा फक्त काही मिनिटे खोल श्वास घेण्याचे व्यायाम (breathing exercises) केल्यास शरीरात उत्साह निर्माण होतो. हे उपाय सहज करता येण्यासारखे आहेत आणि त्वरित प्रभाव दाखवतात.
७. पुरेशी झोप घ्या
जर तुम्हाला रोज थकवा जाणवत असेल, तर त्यामागे झोपेची कमतरता हे मुख्य कारण असू शकते. रोज किमान ७ ते ८ तासांची शांत झोप घेणं आवश्यक आहे. झोपेचा दर्जा सुधारल्यास थकवा आपोआप कमी होतो.
जर हे सर्व उपाय करूनही तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. थकवा ही एखाद्या अंतर्गत समस्येची सुरुवात देखील असू शकते.