
मुंबई : बाणगंगा तलाव परिसरात त्रिपुरा पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कार्तिक महिन्यात येणाऱ्या या दिपोत्सवाचा खर्च तब्बल ४० लाख ४० हजार रुपये इतका होणार आहे. यासाठी दोन कंत्राटदारांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबईतील ऐतिहासिक पर्यटन स्थळांपैकी असलेले बाणगंगा तलाव हे हिंदूंचे महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. महाराष्ट्र प्राचीन स्मारके, पुराणवास्तूशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० अन्वये हा तलाव राज्य सरकारने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. या तलावाभोवती मंदिरे, समाधी, धर्मशाळा, मठ असून हे स्थान राष्ट्रीय महत्त्व असलेले सांस्कृतिक केंद्र आहे. तलावाला लागूनच व्यंकटेश बालाजी मंदिर, सिद्धेश्वर शंकर मंदिर, राम मंदिर व वाळूकेश्वर मंदिर प्रसिद्ध मंदिरे आहेत.
पुरातन काळापासून बाणगंगा तलावास धार्मिक व सांस्कृतिक महत्व असल्याने या ठिकाणी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. या तलावाला मुंबई भेटीवर असलेले अनेक पर्यटक आवर्जून भेट देतात. या ऐतिहासिक तलाव परिसरात दरवर्षी त्रिपुरा पौर्णिमेला मोठा दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही या ठिकाणी कार्तिक पौर्णिमेला दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यात परिसरात विद्युत रोषणाई, फुलांची सजावट, छायाचित्रीकरण, चलचित्रीकरण व व्हिडिओग्राफी, तीन स्क्रीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याशिवाय स्टेज मंडप व खुर्च्यांची व्यवस्थाही केली जाणार आहे. ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक, बॅनर लावले जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. या व्यवस्थेसाठी दोन कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार असून यासाठी सुमारे ४० लाख ४० हजार रुपये खर्च अपेक्षित असल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले.
‘ब’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून मान्यता
बाणगंगा तलावाला हजारो देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. या तलावाचे ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक व प्राचीनकालीन महत्व लक्षात घेऊन, राज्य सरकारने १५ नोव्हेंबर २०२२ मध्ये बाणगंगा तलाव (मलबार हिल, मुंबई) परिसर क्षेत्रास ब वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यास मान्यता दिली.