देशाला 'विकसित भारत' बनवण्याचा संकल्प; जुना फोटो केला शेअर
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर २४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी, म्हणजे ७ ऑक्टोबर २००१ रोजी, पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. आपल्या राजकीय कारकिर्दीतील या महत्त्वपूर्ण वळणाची आठवण करत, पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर त्यांच्या शपथविधी समारंभाचा एक जुना आणि खास फोटो शेअर केला आहे.
आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर करताना पंतप्रधान मोदी यांनी एक भावनात्मक संदेश लिहिला. ते म्हणाले, "आजच्या दिवशी २००१ मध्ये, मी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. माझ्या देशवासियांच्या अथक आशीर्वादाने, मी आता शासनाचे प्रमुख म्हणून माझ्या सेवेच्या २५ व्या वर्षात प्रवेश करत आहे. या वर्षांदरम्यान, आपल्या लोकांचे जीवन सुधारण्यासाठी आणि या महान राष्ट्राच्या प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी माझा सतत प्रयत्न राहिला आहे, या राष्ट्रानेच आपल्या सर्वांचे पोषण केले आहे."
२५ कोटींहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढले
देशाच्या प्रगतीबद्दल बोलताना त्यांनी गेल्या ११ वर्षांतील कामाचा उल्लेख केला. "गेल्या ११ वर्षांत, आम्ही (भारताचे लोक) एकत्र काम केले आहे आणि अनेक बदल घडवले आहेत. आमच्या अभूतपूर्व प्रयत्नांनी संपूर्ण भारतातील लोकांना, विशेषत: आमच्या महिला, युवक आणि मेहनती शेतकऱ्यांना सक्षम केले आहे. २५० दशलक्षाहून (२५ कोटी) अधिक लोकांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढले आहे. आज भारत प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये एक तेजस्वी स्थान म्हणून ओळखला जातो. आपण जगातील सर्वात मोठ्या आरोग्य सेवा आणि सामाजिक सुरक्षा योजनांचे घर आहोत. आमचे शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत आणि आपल्या देशाला आत्मनिर्भर बनवत आहेत. आम्ही व्यापक सुधारणा हाती घेतल्या आहेत आणि सर्वसामान्यांमध्ये 'गर्व से कहो, वो स्वदेशी है' या आवाहनातून आत्मनिर्भर भारताची भावना प्रतिबिंबित होत आहे."
राजकीय प्रवासाची सुरुवात
पंतप्रधान मोदी यांच्या राजकीय वाटचालीबद्दल बोलायचं झाल्यास, ते १९८७ मध्ये भारतीय जनता पक्षामध्ये (भाजप) औपचारिकपणे सामील झाले. याच वर्षी त्यांना पक्षाने महासचिव म्हणून एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली. त्यांच्या मजबूत राजकीय चातुर्याने आणि संघटनात्मक कौशल्याने त्यांनी १९८७ च्या अहमदाबाद महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळवून दिला. त्यानंतर त्यांनी राज्यात संघटनेला बळकट करण्याचे काम सुरू केले, ज्यामुळे १९९० च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला. ७ ऑक्टोबर २००१ रोजी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली आणि २०१४ पर्यंत त्यांनी सलग सेवा दिली. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी गुजरातला नवीन उंचीवर नेले.
पंतप्रधान मोदी यांनी आपला संदेश पूर्ण करताना पुन्हा एकदा भारतातील जनतेचे त्यांच्या सततच्या विश्वासासाठी आणि प्रेमासाठी आभार मानले. "माझ्या प्रिय राष्ट्राची सेवा करणे, हा एक सर्वोच्च सन्मान आहे; एक कर्तव्य आहे जे मला कृतज्ञतेने आणि उद्देशाने भरून टाकते," असे ते म्हणाले. आपल्या संविधानाच्या मूल्यांना मार्गदर्शक मानून, आगामी काळात 'विकसित भारत' बनवण्याचे आपले सामूहिक स्वप्न साकार करण्यासाठी आणखी कठोर परिश्रम घेण्याचा त्यांनी या निमित्ताने संकल्प केला आहे.