पुनःपुन्हा होणारा गर्भपात

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील


गर्भधारणा ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत आनंददायक आणि भावनिक घटना असते; परंतु काही स्त्रियांची ही आनंदयात्रा वारंवार अपूर्ण राहते, म्हणजेच गर्भ पुन्हा पुन्हा वाहून जातो. अशा अवस्थेला ‘पुनःपुन्हा होणारा गर्भपात’ (Recurrent Pregnancy Loss - RPL) असे म्हटले जाते. वैद्यकीय दृष्टीने सलग दोन किंवा तीन वेळा २० आठवड्यांपूर्वी गर्भपात होणे हे पुनरावृत्ती गर्भपातात गणले जाते. ही समस्या सुमारे १-२% महिलांमध्ये आढळते आणि त्यामागील कारणे अनेकदा गुंतागुंतीची असतात.

कारणे


१. गर्भाशयातील संरचनात्मक दोष : गर्भाशयाच्या रचनेतील विकृती जसे की सेप्टेट युटेरस (भिंत असलेले गर्भाशय), युनिकॉर्न्युएट किंवा बिकॉर्न्युएट युटेरस (अर्धवट किंवा दोन भागांमध्ये विभागलेले गर्भाशय) यामुळे गर्भ टिकत नाही. तसेच गर्भाशयात फायब्रॉइड्स, पॉलिप्स किंवा असर्मान सिंड्रोममुळेही गर्भपात होऊ शकतो.

२. हार्मोन्सचे असंतुलन : थायरॉईडचे आजार, प्रोलॅक्टिन वाढलेला असणे, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) किंवा ल्यूटियल फेज डिफिशियन्सीमुळे प्रोजेस्टेरॉन कमी तयार होतो, ज्यामुळे गर्भ टिकत नाही.

३. जनुकीय (Genetic) कारणे : आई-वडिलांपैकी एखाद्याकडे chromosomal translocation किंवा जनुकीय दोष असू शकतो, ज्यामुळे भ्रूणात विकृती निर्माण होऊन गर्भपात होतो. हे कॅरिओटायपिंग तपासणीत समजू शकते.

४. इम्युनोलॉजिकल कारणे : काही वेळा शरीर स्वतःच गर्भाला परकीय म्हणून ओळखून त्याच्यावर हल्ला करते. याला antiphospholipid antibody syndrome (APLA) किंवा autoimmune disorders म्हणतात. यात रक्त गोठण्याची प्रवृत्ती वाढते आणि गर्भाला रक्तपुरवठा कमी होतो.

५. संसर्गजन्य कारणे : टॉक्सोप्लाझ्मा, लिस्टीरिया, रुबेला, साइटोमेगालोव्हायरस इत्यादी संसर्गांमुळे सुरुवातीच्या टप्प्यात भ्रूण नष्ट होतो.

६. जीवनशैली आणि पर्यावरणीय घटक : अत्याधिक ताणतणाव, धूम्रपान, मद्यपान, जास्त प्रमाणात कॅफिन, औषधांचे दुष्परिणाम, कीटकनाशके किंवा प्रदूषण यांमुळे गर्भ टिकण्याची शक्यता कमी होते.

७. वय : ३५ वर्षांनंतर अंड्यांची गुणवत्ता घटते, भ्रूणातील जनुकीय दोष वाढतात आणि त्यामुळे गर्भपाताचे प्रमाण वाढते.

तपासण्या


पुनःपुन्हा गर्भपात झालेल्या जोडप्याला योग्य कारण शोधण्यासाठी खालील तपासण्या महत्त्वाच्या ठरतात :

हॉर्मोनल तपासण्या : TSH, Prolactin, Progesterone इ.
जनुकीय तपासणी : Parental karyotyping.
इम्युनोलॉजिकल तपासण्या : APLA, ANA, Lupus anticoagulant.
गर्भाशय तपासणी : HSG (Hysterosalpingogram), 3D Sonography, Hysteroscopy.
इन्फेक्शन तपासण्या : TORCH profile.

उपचार व उपाय


१. हार्मोनल उपचार : प्रोजेस्टेरॉन सपोर्ट देणे हे गर्भ टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. थायरॉईड व इतर हार्मोनचे असंतुलन असल्यास औषधे नियमित घेणे आवश्यक असते.

२. इम्युनोलॉजिकल उपचार : APLA सिंड्रोम असलेल्या रुग्णांना अॅस्पिरिन व लो मॉलिक्युलर वेट हेपेरिन (LMWH) दिले जाते, ज्यामुळे गर्भाला रक्तपुरवठा नीट होतो.

३. गर्भाशयातील दोषांचे शस्त्रक्रियात्मक दुरुस्ती : सेप्टम, फायब्रॉईड किंवा पॉलिप असल्यास हिस्टेरोस्कोपिक सर्जरीद्वारे दुरुस्ती केली जाते.

४. जनुकीय सल्ला व IVF तंत्र : जनुकीय कारण असल्यास preimplantation genetic testing (PGT) सह IVFद्वारे निरोगी भ्रूण निवडून गर्भधारणा करण्यास मदत होते.

५. मानसिक आधार व समुपदेशन : अनेक वेळा मानसिक ताणामुळेही हार्मोनल असंतुलन वाढते. म्हणून psychological counselling, योग, ध्यान, पुरेशी विश्रांती यांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे.

६. जीवनशैलीत सुधारणा : संतुलित आहार, व्यायाम, वजन नियंत्रण, धूम्रपान-मद्यपान टाळणे, पुरेशी झोप आणि ताणतणाव कमी करणे हे उपाय पुनरावृत्ती गर्भपात रोखण्यात मदत करतात.

७. गर्भधारणेपूर्व तयारी (Preconception Care) : गर्भधारणा होण्यापूर्वी दोघांनीही वैद्यकीय तपासणी करून सर्व कारणे दूर करणे, फॉलिक अॅसिड सुरू करणे, मधुमेह व थायरॉईड नियंत्रणात ठेवणे, संसर्ग टाळणे आणि शरीर तयार ठेवणे गरजेचे असते.

निष्कर्ष :


पुनःपुन्हा गर्भपात होणे ही स्त्रीसाठी अत्यंत मानसिकदृष्ट्या त्रासदायक अवस्था असते, परंतु आधुनिक वैद्यकामुळे बहुतेक कारणे शोधता येतात आणि योग्य उपचारांद्वारे पुढील गर्भधारणा यशस्वी करता येते. अशा रुग्णांनी संयम, वैद्यकीय मार्गदर्शन आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कारण योग्य तपासणी, नियोजन आणि काळजी घेतल्यास आशा नेहमीच जिवंत असते-निरोगी मातृत्व नक्की
शक्य आहे.

drsnehalspatil@gmail.com
Comments
Add Comment

तरुणाईची ‘नेल एक्सटेन्शन’ची फॅशन!

आजच्या तरुणाईमध्ये नेल एक्सटेन्शन हा फॅशन आणि सौंदर्याचा नवा ट्रेंड झपाट्याने लोकप्रिय होत आहे. आकर्षक आणि

कर्करुग्णांची संजीवनी

कर्तृत्ववान ती राज्ञी : उर्मिला बेडेकर - पिटकर आजपर्यंत शेकडो कर्करुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन

शारीरिक स्वास्थ्याची त्रिसूत्री

पूर्वी महिष्मती नगरीत एक श्रीमंत व्यापारी राहत होता. सदैव व्यवसायात व्यग्र असलेल्या या व्यापाऱ्याला अस्वस्थ

चिकन वडा पाव

साहित्य : २५० ग्रॅम बोनलेस चिकन खिमा १ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट १ लहान कांदा बारीक चिरलेला १ टेबलस्पून कसुरी

कन्या पूजनाचे आधुनिक रूप

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर नवरात्र उत्सव म्हणजे शक्तीच्या उपासनेचा एक मोठा पर्व. या नऊ दिवसांमध्ये देवीची

स्तनपानाचे महत्त्व : आईसाठी आणि बाळासाठी

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील आई व बाळ यांच्यातील नातं हे जगातील सर्वात पवित्र नात्यांपैकी एक आहे. या नात्याची