Sunday, November 16, 2025

गुरुवारी राज्यातील ओला, उबर सेवा बंद

गुरुवारी राज्यातील ओला, उबर सेवा बंद

कॅब-रिक्षाचालक जाणार संपावर

मुंबई (प्रतिनिधी) : परिवहन विभागाच्या गलथान कारभाराकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी तसेच कॅब, रिक्षा व टॅक्सीचालक यांच्या मागण्यांची अंमलबजावणी न झाल्याने गुरुवारी (दि.९) प्रवासी सेवा एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय भारतीय गिग कामगार मंचने घेतला आहे. मंच अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी ही माहिती दिली.

डॉ. केशव क्षीरसागर म्हणाले, परिवहन विभागाच्या गैरकारभाराविरोधात कॅब, रिक्षा व टॅक्सी चालकांचे १५ जुलै २०२५ पासून उपोषण, निदर्शने, सेवा बंद अशा विविध पद्धतीने आंदोलने सुरू आहेत. ओला, उबर, रॅपिडो या तीनही कंपन्या सरकारी नियमांना पायदळी तुडवून बेकायदेशीरपणे राज्यात काम करत आहेत. एफआयआर दाखल केल्यानंतरही काम करत आहेत. खासगी दुचाकीवरून प्रवासी सेवा सुरूच आहे. ३० सप्टेंबरला आझाद मैदानात केलेल्या आंदोलनावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट नाकारली. त्यामुळे आंदोलक सरनाईक यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी जात असताना त्यांना आझाद मैदान पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले. त्यांना यलो गेट पोलीस ठाण्यात आणले.

त्यानंतर मुख्यमंत्री यांचे सचिव विद्याधर महाले यांनी आंदोलक व परिवहन विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत मंत्रालयात बैठक घेऊन त्यावर तोडगा काढू, असे निर्देश सहाय्यक आयुक्त भरत कळस्कर यांना दिले होते. परंतु त्यानंतर कार्यवाही झाली नाही. गेले ६ दिवस यावर कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे बंदचा निर्णय गिगने घेतला आहे.

मुंबईत सुमारे साडेसात लाख, त्या खालोखाल पुण्यात ३ लाख, तर नागपूर व नाशिकमध्ये प्रत्येकी २ लाख असे कॅब, टॅक्सी व रिक्षाचालक आहेत. प्रवासी सेवा बंदमुळे चालकांना त्याचबरोबर प्रवाशांनाही फटका बसणार आहे.

Comments
Add Comment